अवैध्यरित्या टाकण्यात आलेला मेडीकल वेस्टेज उचलावा संबंधित हॉस्पिटलवर कारवाई करण्यात यावी
– नगरसेवक नितीन पाटील यांची मागणी
पनवेल(प्रतिनिधी) कर्नाळा स्पोर्ट्स जवळील राष्ट्रीय महामार्गावरील ब्रीजच्या फुटपाथवर अवैध्यरित्या टाकण्यात आलेला मेडीकल वेस्टेज उचलून त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी तसेच या गंभीर प्रकरणाची शहानिशा करुन संबंधित हॉस्पिटलवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक नितीन पाटील यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे आज(दि. १०) केली आहे. या संदर्भात त्यांनी निवेदन दिले असून सदरचे निवेदन उपायुक्त विठ्ठल डाके यांनी स्वीकारले. यावेळी स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, नगरसेवक अमर पाटील उपस्थित होते. नगरसेवक नितीन पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पनवेल महानगरपालिका हद्दीतील कर्नाळा स्पोर्टच्यापुढे राष्ट्रीय महामार्ग असुन, सदर महामार्गावरील पुलावर दैनंदिन जीवनात मोठ्याप्रमाणात वाहतूक होत असते. याचबरोबर सदर आजुबाजूच्या परिसरातील नागरीक राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असलेल्या सर्व्हिस रोडवर दररोज मॉनिग वॉक व सायंकाळी जेवल्यानंतर शतपावली करण्याकरीता येत असतात. मात्र सदर ठिकाणांवर काही दिवसात असे निदर्शनास आले कि, त्याठिकाणी अवैधरित्या मेडिकल वेस्ट टाकले जात असून, त्यामुळे परिसरात मोठ्याप्रमाणात दुर्गधीचे प्रमाण वाढत आहे आणि त्याकारणाने नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. तसेच त्या रस्त्यालगत चालणाऱ्या नागरीकांच्या आरोग्यास मोठा फटका बसू शकतो. एकीकडे कोरोना सारख्या आजारावर आपण शर्थीचे प्रयत्न करुन या आजाराविरोधात लढा देत आहोत, परंतू एकीकडे असे अवैधरित्या काही दवाखान्यांचे मेडीकल वेस्ट रोडवर टाकले जात आहे, हि अतिशय गंभीर बाब आहे. यावर चौकशी करुन हे कृत्य करणाऱ्यांवर कडक स्वरुपाची कारवाई झाली पाहिजे, त्याबरोबर अशाप्रकारे हॉस्पिटलच्या मेडिकल वेस्ट व्यवस्थितरीत्या विघटन न झाल्यामुळे आजूबाजुच्या परिसरातील नागरीकांमध्ये हॉस्पिटल व पनवेल महानगरपालिकेबद्दल असंतोष निर्माण होत आहे. फुटपाथवरील मेडिकल वेस्टेज पासून नागरीकांना त्रास होऊ नये याकरीता. संबंधित विषयाची तातडीने दखल घेत पनवेल महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत तेथील पाहणी करावी व मेडिकल वेस्टेज उचलून अशाप्रकारचे जीव घेणे प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी तातडीने दखल घ्यावी तसेच संबंधित हॉस्पिटलवर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी या निवेदनात अधोरेखित केली आहे.