घरफोडी करून पसार झालेल्या आरोपीला मुद्देमालासह जेरबंद
पनवेल दि.25(वार्ताहर) रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी यांच्या बंधूंच्या घरी चोरी करणाऱ्या चोरट्याला तालुका पोलिसांनी मुद्देमालासह जेरबंद केले आहे.
पाले ठाकूरवाडी येथे राहणाऱ्या रायगड जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा योगिता पारधी यांचे बंधू संतोष जगन पारधी यांच्या घराच्या उघडया खिडकीतून अज्ञात इसमाने प्रवेश करून घरातील एक 10 ग्रॅमची सोन्याची चैन, 5 ग्रॅमची कानातील सोन्याची रिंग, 3 मोबाईल फोन, व 5000 ₹ रोख रक्कम असा एकूण 68,500 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली होती. या संदर्भात फिर्यादी संतोष पारधी यांनी तालुका पोलीस ठाण्यात C.R.No.185/2020 IPC कलम 380 अन्वये तक्रार दाखल केली होती.
सदर गुन्ह्याचे IO API विजय खेडकर व DB पथकाने केलेल्या तांत्रिक तपासात गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मोबाईल फोनपैकी एक मोबाईल फोन यादगीर, कर्नाटक राज्य येथे ऍक्टिव असल्याचे निष्पन्न झाल्याने मा.DCP.परि. 2, पनवेल व मा.ACP,पनवेल विभाग यांचे पूर्व परवानगीने व मार्गदर्शनाने सदर पथकाने तेथे जाऊन एक मोबाईल फोन वापरत असलेल्या एका व्यक्तीकडून हस्तगत केला परंतु सदर व्यक्तीकडे चौकशी करता, त्याने तो मोबाईल फोन रेल्वे स्टेशनवर एका अनोळखी व्यक्तीकडून विकत घेतल्याचे सांगितले.सदर अनोळखी व्यक्तीला शोधून काढणे अवघड होते अशा परिस्थितीत सदर पथकाने हार न मानता कौशल्यपणाला लावून संशयित इसम पवन सुभाष राठोड, वय- 19 वर्ष यास ताब्यात घेतले व त्याची चौकशी करता तो सुरुवातीला मूळचा कर्नाटकचा असल्याचे त्याने सांगितले पण अधिक विश्वासात घेऊन त्याची चौकशी करता तो तळोजा पोलीस ठाणेच्या हद्दीतील देवीचा पाडा येथील रहिवाशी असल्याचे त्याने सांगून प्रस्तुत गुन्ह्याची त्याने स्वखुशीने कबुली दिली व सदरचा गुन्हा हा त्याने त्याचा साथीदार लखन याचेसह केला असल्याचे सांगितले .त्यास सदर गुन्ह्यात अटक करून त्याच्याकडून प्रस्तुत गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल हस्तगत केला.
सदर अटक आरोपी पवन राठोड व फरार आरोपी लखन याचेविरुद्ध तळोजा पोलीस ठाणे येथे घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल आहेत.त्याची अधिक चौकशी करून इतर गुन्हे उघडकीस आणणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांनी दिली.