शिवसेनेच्या ग्रामपंचायत सदस्यांना मारहाण करून पक्षाला शिविगाळ कऱणाऱ्या इसमांविरूद्ध कारवाई करण्याची शिवसेनेची मागणी
पनवेल दि. 30 (वार्ताहर): तालुक्यातील ग्रामपंचायत केवाळे व ग्रामपंचायत वाकडी येथील शिवसेनेच्या ग्रामपंचायत सदस्यांना मारहाणकरून पक्षाला शिविगाळ कऱणाऱ्या इसमांविरूद्ध कारवाई करण्याची मागणी जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी नवी मुंबईचे पोलिस आयुक्तांना दिेलेल्या पत्राद्वारे केली आहे.
तालुक्यातील नुकतीच ग्रामपंचायत निवडणुक पार पडली यात अनेक ठिकाणी शिवसेनेचे सदस्य निवडून आले आहेत. तसेच अनेकांनी भाजप पक्ष सोडून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला त्यामुळे काही जणांनी मनात राग धरून केवाळे ग्रामपंचायत सदस्य अभिराज डांगरकर व वाकडीचे सदस्य नामदेव म्हसकर यांना त्यांच्या घरी जाऊन मारहाण कऱण्यात आली आहे. तसेच शिवसेना पक्षाला शिविगाळ करून पक्षाचा अपमान केला आहे. यात अभिराज डांगरकर याला जास्त मारहाण झाल्याने तो सध्या कामोठे एमजीएममध्ये उपचार घेत आहे. तरी सदर बाब लक्षात घेऊन नवी मुंबई पोलिस आयुक्तांनी याबाबत लक्ष घालून सखोल चौकशी करावी व शिवसैनिकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी केली आहे.