दिव्यांग प्रल्हाद पाटील यांचे प्राण रेल्वे सुरक्षा बलाचे हवालदार हरेश महल्ले आणि उपनिरीक्षक रेणु पटेल यांनी वाचवले
पनवेल, दि.6 (वार्ताहर) ः रोहा ईएमयू मध्ये चढताना तोल गेलेल्या दिव्यांग प्रल्हाद पाटील यांचे प्राण रेल्वे सुरक्षा बलाचे हवालदार हरेश महल्ले आणि उपनिरीक्षक रेणु पटेल यांच्या समयसूचकतेने वाचले . त्याबद्दल दोघांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांचा रेल्वे खात्याकडुन गौरव करण्याची शिफारस पनवेल स्टेशन प्रबंधक नायर यांनी वरिष्ठांकडे केली आहे.
रेल्वे सुरक्षा बलाच्या उप निरीक्षक रेणु पटेल पनवेल स्टेशवर फलाट क्रमांक 5 ते 7 वर गस्त घालीत होत्या. हवालदार हरेश महल्ले फलाट क्रमांक 7 वर रोहा बाजूला सील चेकिंगचे काम करीत होते.फलट क्रमाक 7 वर रोहा जाणारी ईएमयू निघाली असता एक दिव्यांग व्यक्ति त्या चालत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करीत असताना त्याचा तोल जात असल्याचे उप निरीक्षक रेणु पटेल यांच्या लक्षात आले. त्यांनी फलाटावर उभ्या असलेल्या हवालदार हरेश महल्ले यांना ओरडून त्यांना मदत करण्यास सांगितले . त्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता त्या दिव्यांग व्यक्तिला ओढून घेऊन गाडी पासून वेगळे केल्याने त्याला कोणतीही जखम न होता तो फलाटावरून खाली पडण्यापासून वाचला त्यामुळे त्याचे प्राण वाचले . सदर दिव्यांग व्यक्ति प्रल्हाद पाटील ( वय 33 वर्षे ) हे रोहा येथे राहणारे आहेत . त्यांनी आपले प्राण वाचवल्या बद्दल हवालदार हरेश महल्ले आणि उप निरीक्षक रेणु पटेल यांचे आभार मानले. दिव्यांग व्यक्तीचे प्राण वाचवल्या बद्दल पनवेल स्टेशन प्रबंधक नायर यांनी त्यांनाचा उचित गौरव करण्याची शिफारस वरिष्ठांकडे केली असल्याचे सांगितले.