आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पनवेलमधील सुविधा भारत गॅस एजन्सीच्या मालकावर गुन्हा दाखल
पनवेल, दि.5 (वार्ताहर) ः पनवेल मधील उसर्ली येथील सुविधा भारत गॅस एजन्सीचा मालक संजय राम गावंडे उर्फ भैयासाहेब याने त्याच्या एजन्सीत कामाला असलेल्या केशव गावंडे याच्यावर 30 लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करुन त्याच्याकडून 15 लाख रुपये उकळल्याने तसेच त्याची 1 एकरची जमीन सुद्धा लिहून घेतल्याने आलेल्या मानसिक तणावातून केशव गावंडे याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकिस आली आहे. त्यामुळे पनवेल तालुका पोलिसांनी संजय राम गावंडे याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेतील मृत केशव गावंडे (32) हा पनवेल मधील इंडिया बुल्स येथे कुटुंबासह राहाण्यास होता. तसेच तो संजय गावंडे उर्फ भैयासाहेब या नातेवाईकाच्या उसर्ली येथील सुविधा भारत गॅस एजन्सीत व्यवस्थापक म्हणुन मागील 5 वर्षापासून काम करत होता. दरम्यान, गत सफ्टेंबर-2020 मध्ये अचानक संजय गावंडे याने केशवला आपल्या फार्म हाऊसवर बोलावून एजन्सीत 900 ते 1000 गॅस सिलेंडर कमी असल्याचे तसेच त्याने एजन्सीच्या हिशोबात घोळ केल्याचा आरोप त्याच्यावर केला. तसेच त्याला कामावर न येण्याची तंबी देखील दिली. त्यानंतर संजय गावंडे याने दुसऱया दिवशी केशवचे वडील, काका व सासरे यांना आपल्या फार्म हाऊसवर बोलावून घेऊन त्यांना देखील केशवने गॅस एजन्सीचे 25 लाख रुपये व गॅस सिलेंडरचे फेरफार करुन 5 लाख अशी एकुण 30 लाख रुपयांची अफरातफर केल्याचे त्यांना सांगितले. तसेच सदर अफरातफर केलेली 30 लाख रुपयांची रक्कम केशवचे वडील गजानन गावंडे यांनी 31 ऑक्टोबंर 2020 पर्यंत द्यावी, अन्यथा त्यांची 18 लाख रुपये प्रती एकर असलेली बुलढाणा मामुलवाडी येथील 2 एकर जमीन त्याला देण्यात यावी, अशा प्रकारचा मजकुर संजय गावंडे याने सुविधा भारत गॅस एजन्सीच्या लेटरडेवर त्यांच्याकडून लिहून घेतला, तसेच त्याच्यावर सगळ्यांच्या सह्या घेतल्या. त्यामुळे केशवने आपल्या मित्रांकडून व्याजाने पैसे घेऊन तसेच त्याच्या नावाव असलेला फ्लॉट विकून जमा केलेली 10 लाख 79 हजाराची रोख रक्कम संजय गावंडे याला दिली. त्यानंतर संजय गावंडे याने केशवचे वडील गजानन गावंडे यांच्या नावावर असलेली 16 लाख रुपये किंमतीची मामुलवाडी येथील 1 एकर जमीन त्याच्या आत्याचा मुलगा विजय एकळे याच्या नावावर करण्यास भाग पाडले. त्यानंतर केशव व त्याच्या कुटुंबियांनी उर्वरीत 3 लाख 20 हजाराची रक्कम पुढच्या वर्षी द्यावी यासाठी संजय गावंडे याने त्यांच्याकडून 1 लाख 60 हजार रुपयांचे दोन आगाऊ चेक सुद्धा घेतले. संजय गावंडे हा इतक्यावरच थांबला नाही, तर त्याने गत जानेवारी महिन्यात गजानन गावंडे यांच्याकडून शंभर रुपयांच्या स्टँप पेपरवर झालेला सर्व व्यवहार लिहून घेतला. या सर्व प्रकारामुळे केशव गावंडे हा मानसिक दडपणाखाली आला होता. त्यामुळे तो घरात कुणाशीही बोलत नव्हता, फक्त शांत बसून राहायचा, सारखा चिडचिड करायचा. याच मानसिक तणावातून त्याने गत 20 फेब्रुवारी रोजी रात्री जेवल्यानंतर विषारी औषध घेतले. त्यामुळे तो अत्यवस्थ झाल्याने त्याला त्याच्या कुटुंबियांनी रुग्णालायत उपचारार्थ दाखल केले होते. मात्र दोन दिवसानंतर त्याचा मृत्यू झाला. मृत्यूपुर्वी केशव गावंडे याने लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली असून, त्यात त्याने त्याच्या मृत्यूला सुविधा भारत गॅसचा मालक संजय गावंडे उर्फ भैयासाहेब हाच जाबाबदार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मृत केशवची पत्नी पल्लवी हिने पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संजय गावंडे उर्फ भैयासाहेब याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे. अद्याप या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.