पिरकोन येथे सारडे वशेणी रस्त्यावर अपघातग्रस्त गतिरोधकावर रंगविले झेब्रा क्रॉसिंग पट्टे आणि लावले रेडियम रिफ्लेक्टर.
उरण दि 12(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील पिरकोन गावात उरण खारपाडा राष्ट्रीय महामार्ग 86 या रस्त्यावर पिरकोन गावं फणसवाडी (सेक्टर 11 ) या सारडे – वशेणी मार्गावर फणसवाडी मैत्री कट्टा सेक्टर 11 ह्या कट्टयावर एकत्र जमणाऱ्या आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या होतकरु युवकांच्या माध्यमातून एक समाजपयोगी कार्य करण्यात आलं ते म्हणजे पिरकोन ते सारडे दरम्यान पिरकोन फणसवाडी सेक्टर 11 ह्या बस स्टॉप दरम्यान अपघातग्रस्त गतिरोधकावर झेब्रा क्रॉसिंग पट्टे मारण्यात आले आणि झेब्रा क्रॉसिंग च्या पुढे वाहन चालकांना आपल्या वाहनांच्या भरधाव वेगावर नियंत्रण करता यावं म्हणून सिग्नल रेडियम रिफ्लेक्टर सुद्धा मारण्यात आले.
आज पर्यँत उरण – खारपाडा या मार्गावर अनेक अपघात झालेले आहेत त्याची कारण देखील तितकीच अनेक आहेत…प्रशासनाच होणारं दुर्लक्ष त्यातच हा रस्ता सुसाट,मोकळा आणि रुंद असल्या कारणाने वाहने भरधाव वेगाने ये जा करत असतात त्यातच अवजड वाहनांची वाहतूक असेल, खड्डेमय रस्ते असतील,वाहतूक कोंडी ची समस्या असेल… सोबतच काही ठिकाणी तर चक्क गतिरोधकच अपघाताला निमंत्रण देताना दिसत आहेत आणि ह्या गतिरोधका दरम्यान तर एक दोन मोठे अपघात सुद्धा झालेत आणि कित्येकदा भयानक अपघात होता होतांना थोडक्यात वाचलेत. वशेणी सारडे या दिशेकडून पिरकोन कडे येणाऱ्या वाहनांना तो लगेचच लक्षात येत नसल्या कारणाने भरधाव येणारी वाहने अक्षरशः त्या वर येऊन जोरदार आदळत असतात …आणि म्हणूनच भविष्यात ह्या ठिकाणी भयानक अपघात होऊ नये आणि एखाद्या नागरिकाला आपला जीव गमवावा लागू नये आणि वाहन चालकांनी आपली वाहने सावकाश चालवावी या करिता इशारा म्हणून फणसवाडी मैत्री कट्टा सेक्टर 11 या कट्टयावर एकत्र जमणाऱ्या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या तरुण युवकांनी आपलं सामाजिक दायित्व जपतं स्वतःच्या खिशाला चाट देऊन स्वखर्चाने रंगरंगोटी करीता कलर आणि सिग्नल करीता रेडियम रिफ्लेक्टर आणून महाशिवरात्रीच्या पावन पवित्र दिवशी रणरणत्या उन्हात देखील आपलं कर्तव्य बजावत हे सत्कार्य पार पाडलं.
पिरकोन गावचे सामाजिक कार्यकर्ते आणि माजी सरपंच मंगेश भाई म्हात्रे, यतिश गावंड , सूर्यकांत दादा गावंड, राजेंद्र जोशी, सतिश म्हात्रे, अनिल घरत, निशाल गावंड, प्रविण जोशी,सुरेश गावंड,कुंदन गावंड,सुनिल गावंड, प्रमोद जोशी, केतन गावंड, हरिश्चंद्र गावंड, दिलेश गावंड,प्रतिक घरत,सुरज घरत,अभिजित पाटील महेश जोशी या सामाजिक जाण असणाऱ्या तरुणांनी आणि सहकाऱ्यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली. पिरकोन – फणसवाडी सेक्टर 11 सारडे वशेणी मार्गावर एक समाजपयोगी कार्य करत समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.