रिक्षा झाडावर धडकून महिलेचा मृत्यु; चालकासह दोन गंभीर जखमी
पनवेल दि.14 (वार्ताहर)- सलमान खानच्या पनवेल मधील फार्महाऊस लगत पार्टी करून परतणाऱ्या रिक्षा चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने सदर रिक्षा झाडावर आदळून पलटी झाल्याने रिक्षेतील एका महिलेचा मृत्यु तर दुसरी महिला आणि रिक्षा चालक गंभीर जखमी झाल्याची घटना पनवेलमधील वाजे गाव येथे घडली. दरम्यान सदरचा अपघात रिक्षा चालकाचा निष्काळजीपणामुळे झाला असल्याचे आढळून आल्याने पनवेल तालुका पोलिसांनी रिक्षा चालकावर गुन्हा दाखल केला आहे. सदर अपघातातील मृतांमध्ये दर्शना मुनेश मल्होत्रा (वय-33) तर जखमींमध्ये अश्विनी गणेश गायकवाड (वय-23) आणि रिक्षाचालक अशरफ मुसा मोहम्मद (वय-29) या दोघांचा समावेश आहे. यातील दर्शना नेरूळच्या शिरवणे भागात तर अश्विनी कळंबोलीतील रोडपाली भागात राहण्यास आहे. तर जखमी रिक्षाचालक अशरफ उलवे येथे राहण्यास आहे. अशरफ, दर्शना, अश्विनी हे तिघेही एकमेकांच्या परिचयाचे असल्याने ते पनवेलमधील वाजे गाव येथील सलमान खान याच्या फार्महाऊस शेजारी पार्टी करण्यास गेले होते. पार्टी केल्यानंतर तिघे रिक्षाने परतत होते. यावेळी रिक्षाचालक अशरफ दारूच्या नशेत असल्याने त्याला रस्त्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे रिक्षा रस्त्याच्या बाजूलाझाडावर आदळून पलटी झाली. त्यामुळे रिक्षाचालकासह पाठी बसलेले दर्शना व अश्विनी असे तिघे गंभीर जखमी झाले. सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर पनवेल तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिघा जखमींना रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान दर्शना यांचा मृत्यु झाला. त्यामुळेपनवेल तालुका पोलिसांनी रिक्षा चालकावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, रिक्षाचालक अशरफसुद्धा अपघातात जखमी झाल्याने त्याला अद्याप अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.