सावधान.. खारघरवासीय खातात विषारी भाजी….सांड पाण्यावर भाजीची पैदास कारवाई करण्याची मागणी
पनवेल संजय कदम : वार्ताहर :- — खारघरकरानो इथून पुढे बाजारात मिळणाऱ्या पालेभाज्या जरा जपूनच खाण्याची आवश्यकता सध्या निर्माण झाली आहे. कारण खारघर येथील सेक्टर 9 जवळील रेल्वे रुळालगत बहुतांश स्थानकांलगत पिकणाऱ्या पालेभाज्या या गटाराच्या पाण्यावर पिकविण्यात येत असून त्या किरकोळ विक्रेते अथवा हॉटेलचालकांना विकण्यात येत आहेत. गटरातील सांडपाण्यातील रासायनिक पदार्थामुळे या भाज्या आरोग्याला हानीकारक असून रेल्वेने तसेच सिडकोने भाजी पिकवणारे गटाराचे पाणी वापरताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी खारघरचा राजा गणेश चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विजय पाटील यांनी केली आहे.
खारघर रेल्वेस्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गांवरील तिसरे स्थानक आहे. नव्याने व वेगाने विकसित होणारे भूभाग म्हणून खरघरमधील बांधकामे दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यातच खारघर येथील सेक्टर 9 च्या जवळील रेल्वेच्या रुळालगत बाजूनेच जाणाऱ्या सांडपाण्याचा वापर भाजी पिकविण्यासाठी येथील काही भाजी विक्रेते करणाऱ्यानी व्यवसाय थाटला आहे. याठिकाणी छोटे- छोटे वाफे करून पालेभाज्या पिकवण्यात येतात. यात पालक, चवळी, भेंडी, लाल माठ, माठ आदी भाज्यांचा समावेश आहे. मात्र, या पालेभाज्या पिकविण्यासाठी रेल्वे रुळांलगत असलेल्या गटारातील सांडपाण्याचा वापर करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. या सांडपाण्यामध्ये असलेल्या रासायनिक पदार्थामुळे या भाज्यांचे सेवन करणाऱ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याची चिंता काहींनी व्यक्त केली आहे. या भाज्यांमुळे पोटाचे व शरीरावर दूरगामी परिणाम करणारे गंभीर आजार होण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. या भाज्या रेल्वेच्या व सिडकोच्या हद्दीतील जमिनींवर पिकविण्यात येत आहे. सिडकोचा या प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे. हीच विषारी भाजीपाला खारघर शहरात विक्री करीता ठेवला जात असल्याने भाजीपाल्याच्या रुपाने खारघरवासीय विषारी भाजी खात आहेत. यामुळे खारघर वासियांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या भाजी पिकविणारे व विक्री करणाऱयांवर कारवाई करण्यात यावी अश्या मागणीचे पत्र खारघरचा राजा गणेश चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विजय पाटील यांनी सिडकोला दिली असल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे.
शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात
रेल्वे रुळांलगत पिकविण्यात येणाऱ्या भाज्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या सांडपाण्याच्या पाण्यात मोठय़ा प्रमाणावर लेड, आर्सेनिक, मक्र्युरी आदी जड धातूंचा समावेश असतो. पाण्यातील या धातूंवर पिकवलेल्या भाज्या खाल्ल्यास त्याचे शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. अशा भाज्या कच्च्या खाल्ल्यास तात्काळ पोटाचे विकार उद्भवू शकतात. या भाज्या खाण्यापूर्वी नीट धुऊन न घेतल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. असे मत काही आहार तज्ञानी व्यक्त केले आहे.