बापानेच केला आपल्या अल्पवयिन मुलीचा विनयभंग
पनवेल दि.27 (संजय कदम)- 13 वर्षीय अल्पवयिन मुलीचा तिच्या सख्ख्या बापानेच विनयभंग केल्याची घटना उलवे परिसरात घडली आहे.सदर इसमाच्या पत्नीचे निधन झाले असून तो आपल्या तीन मुलींसह उलवे भागात राहत होता. त्यातील 13 वर्षीय आपल्या मुलीवरच त्याची वाईट नजर होती व तिला धमकावून व मारहाण करून तीन-चार वेळा तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. याबाबतची तक्रार तिने एनआरआय पोलिस ठाण्यातसुद्धा केली होती. परंतु पित्याकडून सुरू असलेल्या अत्याचारामुळे ती घर सोडून नेरूळ रेल्वे स्टेशन येथे थांबली असता तिच्या वडिलांनी ती हरविल्याची तक्रार एनआरआय पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर सदर मुलीचा मोबाईलवर संपर्क साधला असता तिने आपण नेरूळ रेल्वे स्टेशन येथे असल्याचे सांगितले. सदर मुलीला पोलिसांनी ताब्यात घेऊन वात्सल्य ट्रस्टमध्ये ठेवून तिला विश्वासात घेत. समुपदेशकांकडून तिची विचारपूस केली असता तिने तिच्यावर घडलेला प्रसंग सांगितला. त्यानुसार एनआरआय पोलिसांनी पिडीत मुलीच्या बापाविरोधात विनयभंग व पोक्सो कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.