राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या पनवेल शहर अध्यक्षपदी अनुराग वाघचौरे यांची निवड.
पनवेल / प्रतिनिधी : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट १३ वे वंशज श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले महाराज यांच्या नावाने व आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात राजे प्रतिष्ठान कामगार सेना हि संस्था कार्यरत असून संस्थेमार्फत जनतेच्या न्यायासाठी, त्यांच्या न्याय हक्कांसाठी हक्काची संघटना म्हणून आज रायगड, मुंबई, पनवेल, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, कल्याण, सोलापूर आदी ठिकाणी जोमाने कार्यरत आहे. पनवेल तालुक्यातील राजे प्रतिष्ठानचे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांच्या प्रथम शाखेच्या उदघाटनप्रसंगी दस्तुरखुद्द छत्रपती उदयनराजे भोसले महाराजांचे आगमन पनवेलमध्ये झाले व त्यानंतर छत्रपती उदयनराजे भोसले महाराजांना अभिप्रेत कामे आजही जोमाने रायगड जिल्ह्यात व पनवेल तालुक्यात सुरु आहेत. राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ जितुकाका यांच्या नेतृत्वात व महाराष्ट्र संघटक प्रमुख अशोक शिगवण अच्चूभाई, उपाध्यक्ष नारायण कोळी, सचिव मंगेश लाड, कार्याध्यक्ष प्रकाश कोळी यांच्या मार्गदर्शनाने रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पनवेल, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, खारघर, कळंबोली, तळोजा, नावडे यापरिसरात राजे प्रतिष्ठान कामगार सेनेची मजबूत बांधणी केली व आजपर्यंत अनेक समाजउपयोगी कार्यक्रम संस्थेमार्फत सुरु आहेत. आजही कोरोना विषाणू साथीचा आजार व लॉकडाऊन दरम्यान राजे प्रतिष्ठान कामगार सेना ही सर्वसामान्य जनतेची ताकद बनून त्यांच्यासाठी लढत आहे याच हेतूने आजही अनेक तरुण तरुणी व प्रतिष्ठित नागरिक राजे प्रतिष्ठानच्या संपर्कात येत आहेत. पनवेलमधील युवा नेतृत्व व धडाडीचे असे अनुराग वाघचौरे यांची पनवेल तालुका शहराध्यक्षपदी आज नियुक्ती करण्यात आली आहे. राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे नाव पनवेलमध्ये व पनवेलमधील नागरिकांच्या न्याय हक्कासाठी व अडीअडचणी सोडविण्याचे काम मी करणार असून व सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी नेहमी लढणार असल्याचे अनुराग वाघचौरे यांनी बोलताना सांगितले. त्यांना राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे कार्याध्यक्ष प्रकाश कोळी व महाराष्ट्र उपाध्यक्ष नारायण कोळी तसेच महाराष्ट्र सरचिटणीस चंद्रकांत धडके मामा व महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक व सचिन लोखंडे यांच्या हस्ते मुंबई मुख्य कार्यालय येथे नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यांच्या या निवडीबद्दल वरिष्ठांनी व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
