माझे कुटुंब माझी जबाबदारीनुसार शिवशक्ती मित्रमंडळाने केली होळी व धुलीवंदन साजरी
पनवेल, दि.30 (संजय कदम) ः महाराष्ट्र शासनाच्या आवाहनानुसार माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमाला सहकार्य करीत शासनाने आखून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करीत शहरातील 100 वर्षे जुन्या असलेल्या शिवशक्ती मित्रमंडळाने होळी व धुलीवंदन उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा केला.
होळी व धुलीवंदन उत्सव साजरा करण्यासाठी पोलीस खात्यातून सुद्धा काही दबाव टाकण्यात आला होता. परंतु आमचे पारंपारिक उत्सव आम्ही नियमात बसून साजरे करू व कोणताही त्रास शासन यंत्रणेला होणार नाही, अशी ग्वाही या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा.नगरसेवक रमेश गुडेकर यांनी दिली व त्याचा परिणाम म्हणजे शिवशक्ती मित्रमंडळानुसार अनेक मंडळांनी आपला पारंपारिक होळी सण साजरा केला. शिवशक्ती मित्र मंडळाच्या माध्यमातून कोरोनाच्या काळामध्ये मास्कचे वाटप करण्यात आले होते. त्याचप्रमाणे अडीअडचणीत असलेल्या रुग्णांना तातडीने मदत मंडळाच्या मार्फत वेळोवेळी करण्यात आली. त्याचप्रमाणे कर्तव्य बजावित असलेल्या पोलीस बांधवांना या मंडळाने सुद्धा अडचणीच्या काळात चहा-बिस्किटे, जेवणाची पाकिटे वाटप केली आहेत. या मंडळाचे अध्यक्ष गोविंदा सुतार, उपाध्यक्ष समीर बताले, कार्याध्यक्ष खंडेश धनावडे, सहकार्याध्यक्ष प्रकाश (नानू) वाघे, खजिनदार संतोष तळेकर, कार्याध्यक्ष समीर कदम, सहकार्याध्यक्ष प्रवीण पोवार, हिशोब तपासणीस अरुण ठाकूर, संयुक्त चिटणीस प्रशांत नरसाळे, सहखजिनदार अनिकेत जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी या कोव्हिडच्या काळात मदतीचा हात पनवेलकरांना दिला व त्यांचे कौतुक सर्वांनी केले आहे. यावेळी सुद्धा त्यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने होळी सण साजरा करताना समाजातील महत्वाचे घटक असलेले उदा.आ.प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर, विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी, कांतीलाल कडू, संजय कदम यांच्यासह इतर मान्यवरांचे पनवेलकरांना कोरोनाचे जनजागृती व्हिडीओ दर्शनी भागात लावून त्या माध्यमातून नागरिकांचे प्रबोधन सुद्धा केले होते. या उपक्रमाचे समाजातील सर्वस्तरातून कौतुक करण्यात येत आहे.