मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या पार्लरवर पोलिसांचा छापा
पनवेल दि.08 (वार्ताहर): मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविल्या जाणाऱया खारघर सेक्टर-3 मधील शगुन फॅमीली स्पावर खारघर पोलिसांनी छापा मारुन मसाज पार्लर चालक मालक व मॅनेजर या तिघांवर पीटा अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. त्याचप्रमाणे सदर मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यसायासाठी ठेवण्यात आलेल्या 2 मुलींना देखील पोलिसांनी ताब्यात घेण्याची कारवाई केली आहे.
खारघर सेक्टर-3 बेलपाडा येथील शुभांगन इमारतीतील शगुन फॅमीली स्पामध्ये बॉडी मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविण्यात येत असल्याची माहिती परिमंडळ-2चे पोलीस उपआयुक्त शिवराज पाटील यांनी खारघर पोलिसांना दिली होती. तसेच सदर मसाज पार्लरवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक विमल बिडवे, महिला पोलीस उपनिरीक्षक अंजना गायकवाड व त्यांच्या पथकाने शगुन फॅमीली स्पामध्ये एक बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली. यावेळी सदर स्पामध्ये वेश्याव्यवसाय चालविण्यात येत असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांच्या पथकाने सदर स्पावर छापा मारला. यावेळी सदर स्पा मध्ये बॉडी मसाजसाठी ठेवण्यात आलेल्या दोन मुलींकडून मसाजच्या नावाखाली वेश्याव्यसाय करुन घेण्यात येत असल्याचे आढळुन आले. त्यानंतर पोलिसांनी सदर मसाज सेंटरचे मालक पुष्पा नायडु, लक्ष्मी राठोड, मॅनेजर अल्वीन सुभाष डाव या तिघांवर पीटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली. तसेच ज्या मुलीच्या माध्यमातून या स्पामध्ये वेश्याव्यवसाय चालविला जात होता, त्या मुलींना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले.
