लॉकडाउनचे नियम मोडणार्या आस्थापनावर कारवाई
ग्रामपंचायत वडघर, करंजाडे व पोलिसांची धडक मोहीम
पनवेल, दि.20 (संजय कदम) ः कोरोना विषाणूचा संक्रमण थांबण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चैन ची घोषणा केली आहे. त्यानुसार शनिवारी आणि रविवारी पनवेल परिसरात कडक बंद पाळण्याच्या सूचना महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले आहेत. मेडिकल आणि हॉस्पिटल वगळता इतर दुकानांचे शटर डाऊनचे आदेश दिले आहेत. मात्र दिलेले आदेश धुडकावून करंजाडे वसाहतीतील आस्थापने सुरु ठेवणार्या आस्थापनांवर करंजाडे, वडघर ग्रामपंचायत व पनवेल शहर पोलिसांनी सयुक्तिकरित्या कारवाई केली.
यावेळी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कोरडे, पोलीस उपनिरीक्षक लाला लोणकर, पोलीस कर्मचारी, करंजाडे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी प्रेमसिंग गिरासे, सरपंच रामेश्वर आंग्रे, वडघर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी डी.यु.देवरे, पोलीस पाटील कुणाल लोंढे, प्रकाश डाकी, जगदीश पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी कारवाई दरम्यान उपस्थित होते. कोरोनाच्या दुसर्या लाटेने अक्षरशा थैमान घातले असून रुग्णही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. कोरोनाविषाणूची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लादले आहेत. परंतु त्याची अंमलबजावणी करण्यासाठी अनेक अडथळे येत आहेत. कोरोना नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीकोनातून राज्य सरकार वेगवेगळ्या उपाययोजना करीत आहेत. 1 मेपर्यंत मिनी लॉक डाऊन घोषित करण्यात आला आहे. तर विकेंडला कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार शनिवारी आणि रविवारी पनवेल परिसरात कठोर पावले उचलण्याचा निर्णय प्राधिकृत अधिकारी म्हणून महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी घेतला होता. या दोन दिवसात फक्त हॉस्पिटल आणि मेडिकलच सुरू राहतील. किराणा, भाजीपाला, दुध फ्लोअर मिल याशिवाय इतर जीवनावश्यक वस्तू काउंटरवर विकता येणार हॉटेलमधील पार्सल सुद्धा काउंटर वर दिले जाणार नसल्याचे घोषित केले होते. या सर्व सेवांना घरी डिलिव्हरी पोहोचवण्याची मुभा देण्यात आली आहे. कोरोनाविषाणू प्रादुर्भाव जास्त वाढू नये. रुग्ण संख्येत वाढ होऊ नये या अनुषंगाने स्थानिक पातळीवर पनवेल महानगरपालिकेने पावले उचलली आहेत. शासनाच्या नियमाचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मात्र शासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करीत पनवेल बरोबरच करंजाडे ग्रामपंचायत व वडघर ग्रामपंचायत हद्दीतील करंजाडे वसाहतीमध्ये आस्थापने शनिवार आणि रविवारी देखील सुरु ठेवले होते. मात्र पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन भोसले- पाटील यांच्या सुचनेनुसार पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कोरडे, पोलीस उपनिरीक्षक लाला लोणकर, करंजाडे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी प्रेमसिंग गिरासे, सरपंच रामेश्वर आंग्रे, पोलीस पाटील कुणाल लोंढे, वडघर ग्रा.प.चे ग्रामविकास अधिकारी डी. यु. देवरे, प्रकाश डाकी, जगदीश पाटील यांच्यासह कर्मचारी यांच्या पथकाने शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करीत आस्थापने सुरु ठेवले असल्याचे निदर्शनास येताच पथकाकडून कारवाई करण्यात आली.
