पनवेल परिसरात तीन वेगवेगळ्या अपघातात 4 जण जखमी ; वाहनांचे नुकसान
पनवेल, दि.11 (संजय कदम) ः गेल्या 24 तासात पनवेल परिसरात झालेल्या तीन वेगवेगळ्या ठिकाणी अपघातामध्ये 4 जण जखमी झाले असून यामध्ये वाहनांचे सुद्धा नुकसान झाले आहे.
पनवेलजवळील मुंबई-गोवा महामार्गावर क्षणभर विश्रांती हॉटेल समोर पनवेल बाजूकडे जाणार्या रोडवर एका भरधाव वेगातील टँकरने मोटार सायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटार सायकलवरील अजित अर्जुन हवालदार (26 रा.दिव गाव) व त्याचा भाऊ जितेश परशुराम हवालदार (28) हे दोघे जखमी झाले असून त्यांच्या मोटार सायकलीचे सुद्धा नुकसान झाले आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून टँकर चालक मोहम्मद इमामुज्जामा मोहम्मद अमिरुझामा शेख (49 रा.वडाळा मुंबई) याला ताब्यात घेतले आहे. तर दुसर्या घटनेत भिवंडी ठाणे येथील अली हसन अख्तर हुसेन शेख हे चिखली, पुणे येथे जाण्यासाठी व्हॅगनार कार एमएच 04 जियु 6294 ने भिवंडी येथून निघाले. ते मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कळंबोली सर्कल पासून साडेतीन किलोमीटर अंतरावर आले असता पाठीमागून आलेल्या होंडा सिटी कार एम एच 02 सीबी 3098 ने त्यांना धडक दिली. या धडकेत त्यांची मोठी मुलगी अलिषा शेख (वय 19) आणि आदीबा शेख (वय 14) या जखमी झाल्या आहेत. या अपघाताची नोंद कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तर तिसर्या घटनेत खारघर जवळील कुटुक बंधन चौकानजिक जाणार्या टेम्पा व गाडीमध्ये झालेल्या विचित्र अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.