संपूर्ण राज्यात प्रत्येक तालुक्यात विद्युत स्मशानभूमी उभारण्यात यावे.उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांचे मुख्यमंत्रीना निवेदन.
उरण दि 19(विठ्ठल ममताबादे )कोरोना रुग्णांच्या मृतांची वाढत जाणाऱ्या संख्येमुळे स्मशानभूमी, दफनभूमी अपुरे पडत असल्याने येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा विचार करून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी, अपुरे मनुष्यबळ लक्षात घेता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रत्येक तालुक्यात विद्युत स्मशानभूमी उभारण्यात यावे अशी मागणी एका निवेदनाद्वारे उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते गोपाळ पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
कोविड 19 च्या महामारीचा गेल्या सव्वा वर्षांपासून प्रकोप चालूच आहे. त्याची आता दुसरी लाट चालू आहे. भविष्यात अश्या लाटा येतच राहतील असे तज्ञाचे मत आहे. भविष्याचा वेध घेऊन महामारीच्या बाबतीत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत परंतु मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणे वाढतच आहे.आणि हे असेच चालू राहिले तर आजमितीस अस्तित्वात असणाऱ्या स्मशानभूमी, दफनभूमी निश्चितच अपूर्ण पडतील. तसेच मृतदेहाची विल्हेवाट लावणारे मनुष्यबळही अपुरे पडेल.म्हणून यासर्व गोष्टीचा विचार करता विद्युत स्मशानभूमी हा एक योग्य पर्याय असू शकतो. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात युद्धपातळीवर एकतरी स्मशानभूमी उभारण्याचा निर्णय घेण्यात यावा व त्याची त्वरीत अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे गोपाळ पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.