नवी मुंबई आंतर राष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी गावागावात मशाल मोर्चा.
उरण दि ९ (विठ्ठल ममताबादे )लोकनेते दि बा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटिल व मध्यवर्ती समितीच्या सुचनेनुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र समन्वय समितीच्या वतीने ०९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनाच्या निमित्ताने नवी मुंबई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात यावे यासाठी लोकनेते दि.बा. पाटील यांच्या जन्म स्थळी जासई, तालुका उरण, जिल्हा रायगड येथे भव्य दिव्य असे मशाल यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वप्रथम श्री छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल जासई येथील हुतात्मा मैदान येथून मशाल पेटवून ती मशाल लोकनेते दि.बा. पाटील सभागृह जासई येथे आणण्यात आले. यावेळी सभागृहात व्यासपीठावर लोकनेते दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील ,लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर,आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, JNPT चे विश्वस्त कॉम्रेड भूषण पाटील,उद्योजक परेश ठाकूर,स्वर्गीय लोकनेते दि.बा. पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील, महिला सामाजिक कार्यकर्त्या सीमा घरत,रेखा घरत,आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रुपेश धुमाळ,पनवेल महानगर पालिकेचे उपमहापौर जगदीश गायकवाड,कामगार नेते सुरेश पाटील, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे राजेंद्र पाटील,लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती,उरण सामाजिक संस्था,भूमीपुत्र ट्विटर ग्रुप,आगरी कोळी युथ फॉउंडेशन, दि.बा.पाटील युथ फोरम,95 गाव गावठाण विस्तार समिती,अखिल कराडी समाज संघटना,आगरी युवा मंच,विविध प्रकल्पग्रस्त संघटना.तसेच सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते यावेळी विविध मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
नवी मुंबई आंतर राष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे असे येथील स्थानिक भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे. या मागणी करिता यापूर्वी मानवी साखळी इशारा आंदोलन तसेच दडपशाही झुगारून सिडको विरोधातील लाखोंच्या संख्येने यशस्वी घेराव आंदोलन करण्यात आले होते.तरी सुद्धा आंतर राष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात आले नाही.महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी तशी एक प्रकारे घोषणाच केली होती. या मागणीला अनुसरून सध्या महाराष्ट्र राज्यात अस्तित्वात असलेल्या महाविकास आघाडीच्या काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या राजकीय पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला जाहीर पाठिंबा दिला. तर रायगड, ठाणे, नवी मुंबई जिल्ह्यातील आगरी कोळी कराडी समाजाच्या विविध संस्था, संघटना, स्थानिक भूमीपुत्र,प्रकल्पग्रस्त यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाऐवजी लोकनेते स्वर्गीय दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली. या मागणीमुळे रायगड, नवी मुंबई जिल्ह्यातील राजकारण पेटले. वादविवाद सुरु झाले. या वादात भारतीय जनता पक्षानेही उडी घेतली व स्थानिकांचे नेतृत्व असलेले लोकनेते दि.बा. पाटील यांच्या नावाला जाहीर पाठींबा दिला. भाजप, स्थानिक भूमिपुत्र, स्थानिक प्रकल्पग्रस्त यांच्याविरोधात महाविकास आघाडी(महाराष्ट्र शासन )असा वाद रंगला .भारत मुक्ती मोर्चा, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट )या राजकीय पक्षांनी बहुजणांचे नेतृत्व दि.बा. पाटील यांच्याच नावाला जाहिर पाठिंबा दिला.महाराष्ट्र शासनाने (महाविकास आघाडीने)लोकनेते दि.बा. पाटील यांच्या नावाला विरोध नाही असे स्पष्ट केले मात्र नाव देण्यास टाळाटाळ करत आहे.राज्य शासन अजूनही बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर ठाम आहे.यामुळे राज्य शासना विरोधात स्थानिक ग्रामस्थ, स्थानिक प्रकल्पग्रस्तामध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.लोकनेते दि बा पाटील यांना लाखो भूमीपुत्रांचे समर्थन आहे.राज्यशासनच्या स्थानिक भूमीपुत्र, प्रकल्पग्रस्त विरोधी भूमिकेचा,राज्य शासनाच्या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी व १६ ऑगस्ट तारखेपासून सुरू होणाऱ्या विमानतळाच्या काम बंद आंदोलनाची जनजागृती व्हावी,जनतेच्या जनभावनेचा आदर राज्य शासनाने केलेला नाही म्हणून, ‘’दडपशाही चले जाव’’ या मथळ्याखाली गावोगाव होणाऱ्या मशाल मोर्चाचे आयोजन केले असून त्याची सुरवात उरण तालुक्यातील जासई गावातून झाली.
ठाणे,नवी मुंबई, रायगड या जिल्ह्यातील मूळ प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी शासनाने बळजबरीने २ रुपये चौरस मीटर या भावाने १९७० सालानंतर टप्प्याटप्प्याने अधिग्रहित केल्या .नवी मुंबई या शहराची निर्मितीसाठी सिडको या शासनाच्या अंगीकृत असलेल्या महामंडळाच्या माध्यमातून झाली. या महामंडळाने वेळोवेळी भूमीपुत्रांवर अन्याय केला आहे. आणि आजही करीत आहे.यासर्व विरुद्ध येथील गोरगरीब, शोषित, वंचित व अठरापगड जातीजमातीच्या मूळ प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी रणशिंग फुंकून देशपातळीवर रान उठवून संघर्ष करणारे असामान्य नेतृत्व म्हणून लोकनायक दि.बा.पाटील यांच्याविषयी ठाणे, रायगड सह राज्य व देशातील प्रत्येक भूमिपुत्रांमध्ये आदरयुक्त स्थान आहे. लोकनेते दि बा पाटील यांच्या त्यागकार्याची संपूर्ण माहिती व जनभावना शासननोंदीत असताना देखील केवळ विशिष्ट हेतूने स्थानिक अस्तित्व नष्ट करण्याचा कुटिल डाव राज्य शासनातर्फे केला गेला आहे.तसेच भविष्यात अन्य जिल्ह्यातही असेच करु हा एक धोक़ादायक संकेत दिला गेलेला आहे.महाराष्ट्राच्या जनतेने याचा निषेध नोंदवत यापूर्वीच मागील महिन्यात मानवी साखळी इशारा आंदोलन व घेराव मोर्च्याच्या माध्यमातून दिला आहे. मूळ प्रकल्पग्रस्त, नागरिक, जनता, विविध पक्ष तसेच अनेक सामाजिक संघटना यांनी लाखोच्या संख्येने एकत्र येऊन नामकरण संदर्भात विविध आंदोलने, संप यांना समर्थन दर्शविले आहे. मात्र दबंगगिरी कार्यपद्धतीचा अवलंबन करून डोळेझाकीचे सोंग आणून दडपशाहीचे धोरण अवलंबिविणाऱ्यांच्या विरोधात आज सोमवारी दि ०९ ऑगस्ट 2021रोजी म्हणजेच क्रांती दिनानिमित्त ठाणे, रायगड, नवी मुंबई मधील प्रत्येक गावागावांत ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून दडपशाही चले जावचा नारा देऊन हजारो मशाली प्रज्वलित करण्यात आल्या.या मशाल यात्रे द्वारे येत्या १६ ऑगस्ट २०२१ पासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे चालू असलेले काम बंद करण्यासाठी तयार रहा असे एकमेकांना सांगत समाजात, गावागावात जनजागृतीही करण्यात आली.
सोमवारी ०९ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११:३० वाजता स्व.दि.बां च्या स्मृतीस्थळ जासई येथील आयोजित क्रांती दिनानिमित्त मुख्य प्रेरणा मशाल प्रज्वलित करण्यात आली.या प्रेरणा क्रांती ज्योतीद्वारे गावागावांत दि.बां.ची स्फूर्ति धगधगली आहे. जासई येथून सुरवात झालेल्या मशालीद्वारे गावागावातील मशाली प्रज्वलित करून मग गावांतील अनेक मशाली प्रज्वलित केल्या गेल्या. ग्रामस्थांनी एकजुटीने शांततेने सायंकाळी ०७:३० वाजता गावागावात मशाल मोर्चा काढला.ज्यात दडपशाही चले जावचा नारा अधिक तीव्र करण्यात आला होता.”लोकनेते दि.बा.पाटील साहेब अमर रहे! अमर रहे!१६ ऑगस्टला विमानतळ काम बंद करु या “अश्या घोषणा मशाल यात्रेत देण्यात आले.