मराठी एकीकरण समितीचे उपोषण स्थगित.
उरण दि १४(विठ्ठल ममताबादे )
मराठी एकीकरण समिती मार्फत ठरल्याप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती वाशी, नवी मुंबई (APMC) येथे मार्केट मध्ये दुकानावर नावे विविध भाषेत होती. शिवाय इतर व्यवहारहि इतर भाषेतून चालू होती. पत्रव्यवहार करूनही हे प्रकार थांबत नसल्याने शेवटी मराठी करणासाठी (गुजराती, हिंदी लादण्याविरोधात) उपोषण आंदोलन नियोजले होते, सदर प्रसंगी आमदार शशिकांत शिंदे आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या समवेत चर्चा व भेट झाली आणि सचिव यांच्या लेखी आश्वासनानुसार दि १९/८/२०२१ रोजी मा. शशिकांत शिंदे संचालक मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या अध्यक्षते खाली APMC मार्केटच्या सभागृहात सकाळी ११:३० वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आल्याने मराठी एकीकरण समितीने उपोषण स्थगित केले आहे.
काय आहे प्रकरण…
कृषीउत्पन्न बाजार समिती मुंबई (APMC Mumbai)चे वाशी नवी मुंबई येथे कार्यालय व येथे खूप मोठे कांदा, बटाटा, भाजी, फळ मार्केट आहे. येथे धान्य बाजार आणि इतर बाजारातील खरेदी, विक्री संबधी ग्राहकांना देण्यात येणारे देयक (बिल) गुजराती,हिंदी भाषेत दिले जातात, तसेच तेथील दुकानावरील पाट्या मराठी नाहीत, धान्यावर लावलेले लहान लहान फलक मराठीत नाहीत, ग्राहकांशी मराठीत संवाद साधला जात नाही, यामुळे अनेक वेळा तेथील शेतकऱ्यांची, ग्राहकांची अडचण होते, बिल समजत नाही, पाट्या समजत नाही म्हणून अनेकवेळा तक्रारी आल्या आहेत अनेक वर्षे असाच प्रकार सुरू आहे, याविरोधात मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य संघटनेने दंड थोपटले असून मागच्या २ वर्षांपासून पाठपुरावा सुरू केला, सभापती, मार्केट अध्यक्ष, प्रशासनाकडे निवेदन देऊन राज्यभाषा अधिनियम १९६४ नियम, राज्यात मराठी सक्ती,शासनाचे विविध आदेशाचे दाखले, ग्राहक अधिकार याद्वारे मराठीची मागणी केली, २०१९ मधील पहिल्या पत्रावर कोणतीही कारवाई नाही म्हणून फेब्रुवारी २०२१ मध्ये पुन्हा सर्वाना निवेदन दिले त्यावेळी समितीला लेखी आश्वासन देऊन लवकर बदल करू असे कळविले गेले, परंतु ६ महिने झाले तरी बदल झालाच नाही म्हणून एकीकरण समिती नवी मुंबई शहर अध्यक्ष योगेश मोहन, समन्वयक राजेश गर्जे, उपाध्यक्ष ओमकार जाधव यांनी पुन्हा ३ ऑगस्ट २०२१ रोजी सभापती आणि बाजार समिती प्रशासनाला बदल होत नाही म्हणून १२ ऑगस्ट रोजी उपोषण आंदोलनाचे पत्र दिले त्यावर सर्व बाजूने हालचाली सुरु झाल्या, स्थानिक पोलीस ठाण्यातून समिती पदाधिकाऱ्यांना आंदोलन करू नये म्हणून नोटिसा दिल्या परंतु नियोजित आंदोलनास समिती राज्य अध्यक्ष गोवर्धन देशमुख, कार्याध्यक्ष प्रदिप सामंत, उपाध्यक्ष महेश पवार, सुदर्शन दळवी, आनंदा पाटील सह शेकडो शिलेदार (कार्यकर्ते) कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) येथे आंदोलनास पोहचले, आ. शशिकांत शिंदे, मंत्री बाळासाहेब पाटील यांचा दौरा असल्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले.मा. सचिवांनी १ महिन्याची वेळ मागून घेतली आणि आंदोलन न करण्याची विनंती केली सदर ठिकाणी मा.आमदार शशिकांत शिंदे आणि मंत्री मा.ना. बाळासाहेब पाटील यांची भेट घडवून पुढच्या आठवड्यात सर्व प्रशासन आणि बाजारातील व्यापारी यांची बैठक लावून बदल घडविण्यासाठी हालचाली करू असे आश्वासन दिल्यामुळे समितीचे उपोषण आंदोलन तात्पुरते स्थगित केले गेले.यावेळी समितीचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
विविध मागण्या संदर्भात मराठी एकीकरण समितीचे नवी मुंबई अध्यक्ष योगेश मोहन म्हणाले की आम्हाला खात्री आहे मंत्री महोदय, आमदार शशिकांत शिंदे, मा. सचिव त्यांचा शब्द नक्की पाळतील आणि जरी आता योग्य वेळेत मराठीला न्याय नाहीच मिळाला, गुजराती, हिंदी पाट्या काढून मराठीला स्थान नाही दिले तर आम्हाला उग्र आंदोलन करावे लागेल आणि आम्ही न्यायालयात देखील जाऊ.
एकीकरण समितीचे उपाध्यक्ष आनंदा पाटील म्हणाले की अनेक वर्षे राजकारणी मंडळीला हा विषय दिसला नाही हे दुर्दैवच, राज्यात मराठी वापराबद्दल फक्त कागदी घोडे नाचवू नये, त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी आणि याकडे मराठी भाषा विभाग मंत्री मा.सुभाष देसाई यांनी लक्ष घालावे.विविध मागणी संदर्भात मराठी एकीकरण समितीच्या मागणीचा विचार करत दि १९/८/२०२१ रोजी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशी नवी मुंबई येथे सकाळी ११:३० वाजता बैठकीचे आयोजन केल्याने होणारे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.आमदार शशिकांत शिंदे यांनी १९/८/२०२१ रोजी सचिव, मार्केट मधील अध्यक्ष आणि समिती पदाधिकारी यांची बैठक घेऊन या एक महिन्यात हा प्रश्न सोडवू असे सांगितले.