मच्छिमारांच्या न्याय हक्कासाठी मुंबई मध्ये मच्छिमार जन आक्रोश मोर्चा.
उरण दि 24(विठ्ठल ममताबादे ) मच्छिमार समाजाचे व्यवसाय उद्धवस्थ करण्याच्या कट-कारस्थानाच्या विरोधात मुंबई महानगर पालिकेच्या विरोधात अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या माध्यमातून सरकार आणि प्रशासनाला कळेल अश्या भाषेत “मच्छिमार जण आक्रोश” मोर्चा बुधवार दिनांक २५ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी ३ वाजता आझाद मैदान, सी.एस.टी, मुंबई येथे धडकणार आहे. वादळाला सातत्याने सामोरे जाणाऱ्या मच्छिमार बांधवांमार्फत मुंबईत वादळाचे रूप धारण करून सरकारी यंत्रणांना जागे करण्याकरिता,विविध मागण्याकरिता “मच्छिमार जन आक्रोश” मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात स्थानिक भूमीपुत्र, मच्छिमार बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
मच्छिमार जेव्हा रस्त्यावर उतरतो तेव्हा मुंबई बंद करण्याची ताकद बाळगतो परंतु प्रत्यक्षात आम्ही कधीच रस्त्यावर उतरून मुंबई बंद करून दाखवली नाही. जो पर्यंत आम्ही आपली खरी ताकद रस्त्यावर उतरून दाखवत नाहीत, तो पर्यंत आमच्यावर अघोरी अत्याचार होतच राहणार आहेत. क्रॉफर्ड मार्केट येथील छत्रपती शिवाजी महाराज मासळी मंडई असो वा दादर येथील सौ. मीनाताई ठाकरे मासळी मंडई असो मच्छिमारांना आपल्याच मुंबईतून हद्दपार करण्याचा डाव सरकारी यंत्रणेत असलेल्या “उपरे” अधिकाऱ्यांमार्फत होऊ लागला आहे आणि आज जर आपण हा डाव हाणून नाही पाडला तर उद्या मुंबईत मच्छिमारांना “उपरे” म्हणुन फिरावे लागण्याची वेळ येऊन राहील. आपली संस्कृती, आपला व्यवसाय, आपली ओळख आणि मच्छिमार असण्याचा अभिमान जर टिकवायची असेल तर प्रत्येक मच्छिमार बांधवांनी रस्त्यावर उतरून मोठ्या संख्येने जण आक्रोश मोर्च्यात सहभागी व्हावे.असे आवाहन अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल यांनी केले आहे.
विविध मागण्या :
१) क्रॉफर्ड मार्केट येथील छत्रपती शिवाजी महाराज मासळी मंडई येथील मासळी व्यावसायिकांना न्याय देण्यात यावे.
२)दादर येथील सौ. मीनाताई ठाकरे मासळी मंडईतील मासळी व्यावसायिकांना न्याय देण्यात यावे.
३)तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मच्छिमारांना त्वरित देण्यात यावी.
४)कोळीवाडयांना गावठणाचा दर्जा देण्यात यावा.
५)ओ.एन.जी.सी च्या सर्व्हेमुळे झालेल्या मच्छिमारांच्या नुकसानाची भरपाई देण्यात यावी.
६)२४० कोटींचा थकीत डिझेल परतावा मच्छिमारांना त्वरित देण्यात यावा.