रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ रॉकेल विक्रेता यांची सखोल चौकशी करा : पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीची तहसीलदारांकडे पत्राद्वारे मागणी.
पनवेल / प्रतिनिधी : महाराष्ट्र शासन मान्य पनवेल तालुक्यातील रास्तभाव धान्य दुकान व किरकोळ रॉकेल विक्रेता हे शिधापत्रिका धारकांना शासनाकडून आलेले धान्य व रॉकेल योग्यरित्या वितरीत न करत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्या अनुषंगाने आपण पनवेल तालुक्यातील रास्तभाव धान्य दुकान व किरकोळ रॉकेल विक्रेता यांची सखोल चौकशी करुन यामध्ये दोषी आढळणाऱ्या रास्तभाव धान्य दुकानदार व किरकोळ रॉकेल विक्रेता यांचा परवाना रद्द करावा अशी मागणी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्यावतीने आज पनवेलचे तहसीलदार यांना पत्र देऊन करण्यात आली. या पत्रामध्ये
१) पनवेल तालुक्यातील रास्तभाव धान्य दुकानदार व किरकोळ रॉकेल विक्रेता हे रास्तभाव धान्य दुकानांमध्ये घेतलेल्या वस्तूंची पावती देत नाहीत.
२) स्वस्त धान्य दुकानांमध्ये लोकांना स्पष्टपणे वाचता येतील असे माहिती फलक लावावेत. या फलकांवर दुकानाची वेळ, सुटीचा दिवस, दुकान क्रमांक, तक्रार वही उपलब्ध असल्याची नोंद, रेशन कार्यालयाचा पत्ता व फोन क्रमांक, रेशनकार्ड संख्या, भय व देय प्रमाण उपलब्ध असलेला कोटा ही माहिती फलकावर स्पष्ट लिहिलेली नसते.
३) रास्तभाव धान्य दुकान सकाळी चार तास व सायंकाळी चार तास सुरु असायला हवे. तसेच आठवडी बाजाराच्या दिवशी सुरु असले पाहिजे. आठवडयातून दुकान एकदाच बंद ठेवता येते. रेशन दुकान आठवडयात एक दिवसाहून जास्त दिवस बंद राहत असेल तर त्या बंद दुकानाची छायाचित्रे शासनाच्या ऑनलाईन लिंकवर अपलोड करणे बंधनकारक असताना पनवेल तालुक्यातील धान्य दुकानदार हा नियम पाळत नाहीत.
४) पनवेल तालुक्यातील शासनमान्य रास्तभाव धान्य दुकान व रॉकेल विक्रेता हे शिधापत्रिका धारकांना चौकशी करावयास गेले असता धान्य संपले, धान्य आले नाही अशी उडवाउडवीची उत्तरे देवून शासनाकडून आलेले धान्य लाभार्थीना वितरीत करीत नाही यासारख्या नागरिकांच्या तक्रारीचे योग्य मुद्दे मांडले आहेत. तसेच रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ रॉकेल विक्रेता यांची सखोल चौकशी करा अशी मागणी देखील लेखी पत्र देऊन तहसीलदारांकडे करण्यात आली. यावेळी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे, कार्याध्यक्ष केवल महाडिक, सचिव विशाल सावंत, सदस्य सनिप कलोते, दिपाली पारसकर , ओमकार महाडिक आदी उपस्थित होते.
