भारतीय मजदुर संघाची जिल्हाधिकारी कार्यालयावर महागाई विरोधात निदर्शने.
उरण दि 9(विठ्ठल ममताबादे )भारतीय मजदूर संघाच्या अयोध्या येथील बैठकीत ठरल्याप्रमाणे बुधवार दि. 8 सप्टेंबर रोजी भारतीय मजदुर संघाच्या वतीने राज्यभर महागाई विरोधात धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालय रायगड-अलिबाग येथे महागाईचा निषेध करत विविध मागण्या संदर्भात भारतीय मजदूर संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले. गेल्या दीड वर्षा पासून लॉक डाऊन चालू आहे, व्यवसाय बंद आहेत, कामगारांचे रोजगार गेले आहेत,कामगारांच्या दैनंदिन गरजा भागविणे अशक्य झाले आहे, असंघटित कामगारांची दशा वाईट झाली आहे,पेट्रोल-डिझेल च्या किमती वाढल्या आहेत,जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे संघटित व असंघटित क्षेत्रातील गरीब कामगारांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय मजदुर संघाच्या रायगड जिल्हा शाखेने आंदोलन केले.यावेळी प्रदेश अध्यक्ष अनिल धुमने,प्रदेश सरचिटणीस मोहन येनुरे,प्रदेश सचिव विशाल मोहिते, जिल्हा अध्यक्ष सुरेश पाटील,जिल्हा सरचिटणीस अशोक निकम,जिल्हा कोषाअध्यक्ष संदीप मगर, एम. के .सिंग, सुधीर घरत, लंकेश म्हात्रे,रंजन कुमार ,विकास पाटील, इत्यादी भारतीय मजदुर संघाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
आंदोलनातील प्रमुख मागण्या –
1)पेट्रोल डिझेल, खाद्यतेल व अन्य जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी करा.भाव वाढीवर त्वरित नियंत्रण आणा.
2)अवाजवी नफेखोरी ला आळा घाला. अवाजवी नफेखोरी टाळण्यासाठी प्रत्येक वस्तूवर त्या वस्तूचा उत्पादन खर्च छापण्याची कायद्याने सक्ती करा.
3)घरेलु बांधकाम,फेरीवाले रिक्षा टॅक्सी चालक इत्यादी कामगारांना दहा हजार एवढी रक्कम अनुदान म्हणून द्या.
4)मुंबईतील लोकल प्रवास सामान्यांसाठी सुरू करा.
5)महाराष्ट्रातील महाड, चिपळूण, कोल्हापूर सांगली आदी पूरग्रस्तांना भरीव मदत द्या.
6)सार्वजनिक आणि खाजगी उद्योगातील कामगारांना महागाईच्या प्रमाणात मोबदला द्या.
7)शेतकऱ्यांना त्याचा योग्य मोबदला देऊन उत्पादन वाढीसाठी आवश्यक उपाययोजना करा.
8)अत्यावश्यक वस्तू अधिनियम कायदा कलम 3(1)अन्वये डाळी, खाद्यतेल, कांदे, बटाटे आदी जीवनावश्यक बाबींना दिलेली सूट त्वरित मागे घ्या.
9)डिझेल, पेट्रोल अन्य पेट्रोलियम पदार्थ प्रमाणेच जिएसटीच्या कक्षेत आणा.इत्यादी मागण्या करण्यात आल्या.