पनवेल परिसरातील रेती उपसा करणाऱ्या माफियांवर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी
पनवेल, दि.13 ( वार्ताहर): मागील वर्षभरापासुन पनवेल परिसरासह कोपरा खाडीत सुरु असलेला रेती उपसा सर्रास सुरु आहे.विशेष म्हणजे या रेती माफियांना कोणाचीच भीती राहिली नसून दिवसाढवळ्या देखील थेट खाडीत सक्शन पंप लावुन हा उपसा केला जात आहे.या अवैध्य उत्खननामुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसूल तर पाण्यात जात आहेच त्या व्यतिरिक्त या खाडीवर उभारलेल्या रेल्वे व महामार्ग पुलाला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे.
रेतीमाफियांना शासकीय पातळीवर महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्यानेच रेती माफियांना कोणाचीच भीती राहिली नसल्याचे दिसून येत आहे.रात्रभर सुरु असलेल्या सक्शन पंपाच्या कर्कश आवाजाने खाडीकिनारी वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना देखील मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.वर्षभरात महसूल विभागाच्या माध्यमातुन याठिकाणी दोन ते तीन कारवाया करण्यात आल्या आहेत.मात्र या कारवाईत रेतीमाफिया व मुख्यसूत्रधारांना जाणून बुजून डावलण्यात आले.शासनाच्या महसूल विभागामार्फत अवैध्य उत्खनावर आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जातात.तहसीलदारांना अशाप्रकारे रेतीमाफियांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.मात्र पनवेल मध्ये शासनाचा करोडो रुपयांचा महसूल वाया जात असताना पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर याबाबत कारवाई करण्यास टाळाटाळ का करीत आहेत ? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.महसुल विभागाशी संगनमत करून शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडवला जात नाही ना ?असाही प्रश्न उद्भवत आहे. कोपरा खाडीत असलेला रेल्वे पुल ,सायन पनवेल महामार्गावरील पुल दोघांना उत्खननाचा धोका निर्माण झालेला असताना शासकीय यंत्रणा सर्रास अशाप्रकारे सुरु असलेल्या अनधिकृत उत्खनन करणाऱ्या रेती माफियांना पाठीशी घालत आहेत हि आश्चर्याची बाब आहे. तरी शासनाने लक्ष घालून या रेती माफियांविरोधात कारवाई करावी अशी मागणी जोर धरीत आहे.