कडापे येथील लिम डोंगर परिसरातील वणवा विझविण्यात फ्रेंड्स ऑफ नेचरच्या सदस्यांना यश.
उरण दि 10(विठ्ठल ममताबादे ) सारडे गावाच्या दक्षिणेकडे कडापे गावालगत असलेल्या लिम डोंगर येथे मोठया प्रमाणात वणवा लागला होता. अशी माहिती कडापे येथील फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन)सर्पमित्र, निसर्ग संवर्धन संस्था चिरनेर-उरण चे सदस्य ऋषीकेश म्हात्रे यांना मिळाली त्यांनी त्वरित संस्थेचे सारडे येथील सदस्य राकेश शिंदे यांना संपर्क करून या घटनेची माहिती दिली. दोघेही वणवा लागलेल्या ठिकाणावर पोहोचल्यावर तेथे मोठया प्रमाणात वणवा पेटला होता. यामध्ये सुका पालापाचोळा आणि काही छोटी झाडे पूर्णतः जळून गेली होती. वनखात्याची मदत येईल ना येईल त्याची वाट न पाहता ऋषिकेश म्हात्रे व राकेश शिंदे यांनी आग विझविण्याचे प्रयत्न चालू ठेवले.
ऋषीकेश म्हात्रे आणि राकेश शिंदे यांनी अथक प्रयत्न करून एक तासात पूर्ण वणवा आटोक्यात आणला. त्यामुळे आग अजून पसरण्याचा धोका टळला.उरण तालुक्यात डोंगरावर, माळरानावर वणवा लागण्याच्या तसेच आगी लावण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आग लावणाऱ्या व सजीव सृष्टीचा नाश करणाऱ्या, पर्यावरणाचे नाश करणाऱ्या समाज कंटकावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी फ्रेंड्स ऑफ नेचर या संस्थेने तसेच सर्व निसर्गप्रेमी, प्राणी मित्रांनी केली आहे.