माहितीच्या अधिकार कायद्या अंतर्गत माहिती देण्यास नागाव ग्रामपंचायतची टाळाटाळ
उरण /प्रतिनिधी
माहितीच्या अधिकाराखाली विविध विषया संदर्भात उरण तालुक्यातील नागाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संकेत भालचंद्र म्हात्रे, जितेंद्र जनार्दन ठाकूर यांनी नागाव ग्रामपंचायत कडे माहिती मागविली असता, रीतसर पत्रव्यवहार करून देखील यांना माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे संकेत म्हात्रे, जितेंद्र ठाकूर यांनी प्रथम अपिलीय अधिकाऱ्याकडे अर्ज करून माहिती देण्याची व वेळेत माहिती न देणाऱ्या नागाव ग्रामपंचायतवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सण 1 जानेवारी 2017 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीतील मासिक बुकच्या सत्यप्रत मिळावे, सण 1 जानेवारी 2017 ते 30 नोव्हेंबर 2021 ऑडिट रिपोर्टच्या सत्यप्रत मिळावेत,1 जानेवारी 2017 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीतील कॅशबुक सत्यप्रत मिळावेत,सण 2017 ते 2021 या कालावधीत 14 व्या वित्त आयोगाचा किती निधी आला. त्यातून झालेला खर्च व शिल्लक राहिलेली रक्कम व कॅशबुकची प्रत मिळावे ही मागणी /माहिती अर्जदार संकेत म्हात्रे, जितेंद्र ठाकूर यांनी माहिती अधिकारा खाली रीतसर पत्रव्यवहार करून मागितली होती. मात्र या प्रश्नाला नागाव ग्रामपंचायतकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. उलट सदर ग्रामपंचायत संबंधित माहिती देण्याचे टाळाटाळ करीत असल्याचे संकेत म्हात्रे, जितेंद्र ठाकूर यांनी सांगितले. सदर अर्ज 23/11/2021 रोजी करण्यात आला होता. सदर अर्जावर 15 दिवसात जास्तीत जास्त 30 दिवसात अर्जंदारांना माहिती देणे बंधनकारक होते. मात्र माहिती देण्याचा कालावधी संपून आज अनेक महिने झाले तरीही संबंधित माहिती अर्जदारांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे माहिती वेळेत न देणाऱ्या व माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सदर नागाव ग्रामपंचायतवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते संकेत म्हात्रे, जितेंद्र ठाकूर यांनी केली आहे.
कोट (चौकट )
नागाव ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारा विरुद्ध कोणीही बोलू नये यासाठी दपडशाही मार्गाचा वापर केला जात असून कोणतेही प्रकारची माहिती मिळणार नाही अशा प्रकारची उद्धट उत्तरे ग्रामविकास अधिकारी किरण केणी यांच्याकडून देण्यात येत आहेत.
– संकेत म्हात्रे
माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 19(2) नुसार कोणतेही व्यक्ती किंवा संस्था माहिती मिळवू शकतो. परंतु या सरकारच्या निर्णयाला केराची टोपली दाखवत सुमारे 4 ते 5 महिने होऊनही कोणतेही माहिती देण्यास नागाव ग्रामपंचायत तयार नाही. वारंवार फेऱ्या मारूनही अनेक अर्ज पेंडिंग ठेवण्यात आले आहेत. ग्रामसेवक नक्की कोणाला वाचवत आहेत याची उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी
– जितेंद्र ठाकूर