मराठी पाऊल पडती पुढे; सत्यानंद गायतोंडे यांची कॅनडातील विशेष टास्क फोर्स पोलीस अधिकारी अधिकारी म्हणून निवड
पनवेल दि.३० : मुंबईतील रहिवासी असलेले सत्यानंद गायतोंडे यांनी आपल्या कामाचा झेंडा अटकेपार रोवत कॅनडा येथे पोलीस अधिकारी म्हणून काम करत असताना त्यांची नुकतीच विशेष टास्क फोर्स अधिकारी म्हणून निवड झाल्याने मराठी माणसाचे ऊर अभिमानाने भरून आले आहे. गेली २० वर्षे कॅनडा पोलीस आणि गुप्तचर यंत्रणेमध्ये सेवा बजावल्यानंतर त्यांना ही पदोन्नती दिली आहे.
मराठी माणूस हा फक्त देशापुरती मर्यादित न राहता त्यांनी परदेशांत सुद्दा आपल्या कामाची चुणूक दाखवावी व वेगवेगळ्या क्षेत्रात तेथे सुध्दा आपल्या देशाचे नाव उंचवावे त्यात प्रामुख्याने सुरक्षा विभागात आपली तरुण पिढी यशस्वी व्हावी या उद्देशाने सत्यानंद गायतोंडे हे गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळे प्रयत्न करीत आहेत. त्याअनुषंगाने ते भारतात आल्यावर वेगवेगळ्या सामाजिक संस्था, संघटना, पोलीस खाते यांच्या माध्यमातून सुरक्षासह इतर विषयावर विशेष सेमिनार सुद्धा आयोजीत करून तरुणांना मार्गदर्शन करीत असतात. त्यांनी राज्यभरात मोठ्या प्रमाणात सेमिनार राबवले आहेत. मुंबईचे रहिवासी असलेले सत्यानंद गायतोंडे यांनी गिरगावमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी युनायटेड किंग्डमच्या कॅटमधील मर्चंट नेव्ही कॉलेजमध्ये प्रवेश घेत पुढील शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर, कॅनडामध्ये स्थलांतरित झाले. कॅनडा पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये २० वर्षे सेवा बजावल्यानंतर त्यांना विशेष टास्क फोर्स अधिकारी म्हणून पदोन्नती झाली आहे. ‘प्रामाणिकपणे बजावलेल्या सेवेमुळे हे यश मिळाल्याचे गायतोंडे सांगतात. मुंबईतल्या सेमिनारनंतर नाशिक पोलिसांकडून त्यांना बोलावण्यात आले. नाशिकपाठोपाठ पुणे, ठाणे, नवी मुंबई, दिल्लीत सेमिनार पार पडले. मरोळमध्ये सलग १६ सेमिनार पार पडले आहेत. जगभरात त्यांचे सेमिनार सुरु आहेत. यापैकी भारतात १०० सेमिनार पार पडले आहेत असे गायतोंडे यांनी सांगितले. या सेवेदरम्यान गायतोंडे यांनी वेळोवेळी भारतात येऊन राज्य पोलीस दलातील पोलिसांसाठी सेमिनार राबवले, तसेच मुंबई वाहतूक व्यवस्थापन आणि पोलीस अधिकारी सुरक्षा यावर पुस्तकही लिहिले. एका सहकारी पोलिसाच्या आत्महत्येनंतर भारतीय पोलिसांसाठी काहीतरी करण्याचे ठरवून त्यांनी सेमिनार राबविण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे रोटरी क्लबच्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अश्या प्रकारचे सेमिनार भरवले होते. त्यामध्ये त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून देशासाठी काहीतरी करावे हि उर्मी त्यांना परदेशात वास्तव्यास असूनही गप्प बसून देत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
फोटो : सत्यानंद गायतोंडे