उरण नाका येथील मातीचा ढिगारा वाहनधारकांना अडथळा
फेव्हर ब्लॉक बसले मात्र तेथील मातीचा ढिगारा तसाच पडून
- मातीचा ढिगारा ताबडतोब हटवावा : अपघात होण्याची शक्यता
पनवेल/प्रतिनिधी — उरण नाका येथील यश हॉस्पिटलच्या खाली तसेच न्यू गणेश स्वीट मार्ट दुकानाच्या समोरच रस्त्यावर पनवेल महापालिकेच्या नेमलेल्या ठेकेदाराकडून खड्ड्याच्या जागी नव्याने फेव्हर ब्लॉक बसविण्यात आले, मात्र फेव्हर ब्लॉक बसविताना त्याठिकाणाहून काढलेली माती गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून रस्त्यावरच ढिगारा साचून पडून आहे. या ढिगाऱ्यामुळे परिणामी येथून ये-जा करणाऱया वाहनधारकांना या ढिगाऱयामुळे अडथळा निर्माण झाला आहे. तसेच रात्री देखील या ढिगाऱयांमुळे अनेक अपघातही होत आहेत.
पनवेल परिसरातील नाक्यावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. यावेळी वाहतूक कोंडी सोडविण्यास त्या ठिकाणी नेमलेल्या वाहतूक पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे. यातच गेल्या पंधरा दिवसांपूर्वी पनवेल महानगरपालिकेकडून येथीलच रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या ठिकाणी नेमलेल्या ठेकेदारामार्फत फेव्हर ब्लॉक बसविण्यात आले. यावेळी यश हॉस्पिटलच्या खाली तसेच न्यू गणेश स्वीट मार्ट या दुकानाच्या समोरच रस्त्यावर फेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी त्याठिकाणी असलेली माती रस्त्याच्या बाजूला काढून ठेवली होती, त्या मातीचा पावसामुळे ढिगारा बनला आहे. मात्र हा मातीचा ढिगारा वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून रस्ता देखील निमुळता झाला आहे. तसेच रस्त्यावर मातीचे साम्राज्य पसरलेले पाहायला मिळत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ही परिस्थिती तशीच असून वाहनधारकांना या मार्गावरून जाताना कसरत करावी लागत आहे. तसेच या मातीच्या ढिगाऱयामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे येथील रस्ता लवकरात लवकर करावा येथील मातीचा ढिगारा ताबडतोब हटवावा, अशी मागणी होत आहे.

