दहा दिवसांच्या गणपतींचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन – आयुक्तांनी केली विसर्जन घाटांची पहाणी
पनवेल दि.9: महापालिका क्षेत्रात दीड दिवस, पाच दिवसांच्या गणपतींचे उत्साहपूर्ण वातावरणात नियोजनबध्द विसर्जन झाल्यानंतर दहा दिवसांच्या गणपतींचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. सिडकोने हस्तांतरीत केलेल्या सेवा सुविधांमध्ये यावर्षी प्रथमच पनवेल महापालिकेकडे गणेश विसर्जन घाटांचे हस्तांतरण झाले असल्याकारणाने आयुक्त श्री.गणेश देशमुख यांनी गणोत्सवाच्या तयारीमध्ये जातीने लक्ष घातले होते. दरम्यान दहा दिवसांच्या गणपतींचे विसर्जन घाटावरती विसर्जन व्यवस्थित सुरू असल्याची आयुक्तांनी पहाणी करून सोयी सुविधांचा आढावा घेतला. यावेळी उपायुक्त कैलास गावडे आणि प्रभाग अधिकारी उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती गेले दोन वर्षे गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला होता. मात्र यावर्षी नागरिकांचा उत्साह पाहता पालिकेने गणोत्सवाची जय्यत तयारी केली होती. विसर्जनावेळी पाऊस असताना देखील गणेशभक्त मोठ्या भक्तीमय वातावरणात घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या श्रीगणेशाचे विसर्जन करताना दिसून आले. नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी पालिकेच्या बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, विद्युत विभाग, परवाना विभाग, भांडार विभाग, वाहन विभाग व वैद्यकीय विभाग या ७ विभागांच्या माध्यमातून समन्वय साधून गणोशोत्सवाची मोठ्या उत्साहात तयारी केली होती.
यावर्षी महापालिका क्षेत्रात चारही प्रभागांमध्ये जवळपास 61 ठिकाणी गणपती विसर्जन घाटावरती महापालिकेच्यावतीने तयारी करण्यात आली होती. याठिकाणी मंडप, लाईट, टेबल-खुर्ची ,जनरेटर ,हॅलोजन, स्टेज, बॅरिगेटस्, क्रेन, हायड्रा, निर्माल्य कलश, लाऊड स्पीकर, लाईफ जॅकेट, तराफा या सर्वांची तयारी करण्यात आली आहे. आयुक्त गणेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गणोत्सवाचे उत्तम नियोजन केले होते. यामध्ये खारघर मध्ये ३७ ठिकाणी विसर्जनाची सोय करण्यात आली असून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत खारघर प्रभागामध्ये 265 गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. कळंबोली प्रभागामध्ये 9 ठिकाणी विसर्जनाची सोय करण्यात आली असून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत येथे 267 गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. कामोठे प्रभागामध्ये ६ ठिकाणी विसर्जनाची सोय करण्यात आली असून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 331गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. पनवेल प्रभागामध्ये 9 ठिकाणी विसर्जनाची सोय करण्यात आली असून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 20गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले होते.
घनकचरा आणि आरोग्य विभागाअंतर्गत विसर्जन घाटावर साफसफाईची आणि निर्माल्य कलश ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यासाठी विविध घाटांवर पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. गणेश विसर्जनावेळी त्या त्या ठिकाणी पथके तैनात करण्यात आली होती. या पथकामध्ये एका अधिकाऱ्याबरोबर ४ व्यक्तींचा समावेश होता. यामध्ये सफाई कामगार, स्वच्छता निरीक्षक, प्रभारी स्वच्छ्ता परीक्षक, मुकादम अशी एक टीम योजण्यात आली होती.. प्रत्येक टीम ही विसर्जनाच्या मुख्य तारखांना दुपारी २ वाजल्यापासुन ते शेवटच्या मूर्तीचे विसर्जन होईपर्यंत घाटावर उपस्थित राहण्याबाबत त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी मोबाईल टॉयलेटची सोय केली आहे.
मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन असते त्या विसर्जन घाटावर महापालिकेतर्फे हायड्राची, क्रेनची सोय करण्यात आली होती. महत्त्वाच्या आणि ज्याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते अश्या ठिकाणी वैद्यकीय आरोग्य पथकाची रुग्णवाहिकेसह नियुक्ती पालिकेच्यावतीने करण्यात आली होती.
आपत्ती व्यवस्थापन विभागास आणीबाणीच्या वेळी तयार राहण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या होत्या. ज्या ज्या ठिकाणी फायर स्टेशन आहेत तिथे शिफ्टमध्ये लोकांच्या नियुक्त्या केल्या होत्या. महापालिका हद्दीतील सर्व घाटांकडे जाणाऱ्या रस्त्यावरील झाडांची छाटणी करण्यात आली होती .एकुणच कोरोनाकाळानंतरच्या या गणेशोत्सवाची सर्व तयारी पालिकेने मोठ्या प्रमाणात केली होती.
चौकट
दीड दिवसाचे गणपती एकुण संख्या -7,306
पाच दिवसाचे गणपती एकुण संख्या – 3,237
सहावा दिवस गौरी –गणपती विसर्जन- 10,659
दहा दिवसांचे गणपती विसर्जन( संध्याकाळी 6 वाजेपर्यंत)- 883
चौकट
पनवेल महापालिकेस सहकार्य
१) नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान कळंबोली तर्फे निर्माल्य घेऊन जाऊन कंपोस्ट खत तयार करण्यासाठी वापर करणार आहेत.
२) अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट ट्रॅफिक कमी करण्यासाठी सेवा देत आहेत.
३) रोटरी क्लब कळंबोली तर्फे ट्रॅफिक व गर्दी कमी करण्यासाठी सेवा देत आहेत.