- पोलिसांच्या वेलनेस टीमने डीवाय पाटील हॉस्पिटलला दिली अचानक भेट
पनवेल, दि.16 (वार्ताहर) ः गेल्या चार महिन्यापासून नवी मुंबई पोलीस दल आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी, वेलनेस टीम सातत्याने कार्यरत आहे. पोलीस आयुक्त बिपिन कुमार तसेच सहपोलीस आयुक्त जाधव यांनी दिलेल्या निर्देशानुसार डी वाय पाटील हॉस्पिटल येथे भेट दिली व तेथे उपचार घेणार्या पोलीस बांधवांसह त्यांच्या कुटुंबियांची चौकशी केली. त्यांना दिलासा दिला.
प्रथम डी वाय पाटील हॉस्पिटल चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल पेड्डावाढ यांच्याशी बेडच्या उपलब्धतेबाबत व आणखी बेड मिळण्याबाबत, तसेच आयसीयु मध्ये दाखल असलेले 4 रुग्ण आणि ऑक्सीजन वर असलेले 10 रुग्ण यांच्या तब्येतीबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे विनोद चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोल्हटकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन गरड यांनी डी वाय पाटील हॉस्पिटल येथील कॉर्डिनेटर स्टाफ यांना सोबत घेऊन, सर्वांनी पीपीई किट परिधान केले. तसेच डी वाय पाटील हॉस्पिटल येथील दाखल असलेल्या जवळ-जवळ सर्वच 50 – 55 पेशंट यांच्याशी समक्ष भेट घेऊन तब्येती बाबत विचारपूस केली व आयुक्तांच्या वतीने, त्यांना धीर दिला आणि त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच जेवणा बाबतही चौकशी करून, स्वतः जेवण तपासून घेतले. एकंदरीत पोलिस आयुक्त यांच्या निर्देशानुसार वेलनेस टीमने अचानकपणे समक्ष भेट देऊन आस्थेवाईकपणे चौकशी केल्याबद्दल, पोलीस रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले.
फोटो ः विशेष पथकाने दिलेली अचानक भेट