कळंबोलीतील दुरावस्थेतील रस्त्यांची सिडकोकडून डागडुजी सेक्टर 14 आणि 15 मधील खड्डे बुजवण्यात सुरुवात, स्थानिक नगरसेवकांच्या पाठपुराव्याला यश
पनवेल /प्रतिनिधी:- कळंबोली वसाहतीतील प्रभाग क्रमांक सात मधील सेक्टर 14 आणि 15 येथील रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. रस्ते खड्ड्यात की खड्डे रस्त्यात अशी परिस्थिती येथे असल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. दरम्यान यासंदर्भात स्थानिक नगरसेवक राजेंद्र शर्मा, अमर पाटील, प्रमिला रविनाथ पाटील यांनी पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत सिडकोने खड्डे बुजवण्यात सुरुवात केली आहे. त्यामुळे तात्पुरता दिलासा येथील नागरिकांना मिळणार आहे.
सेक्टर 14 आणि 15 या परिसरात बी यु डीपी योजनेअंतर्गतील घरे आहेत. याठिकाणी लोकवस्ती ही मोठी आहे. समोर 40, 60, 100 आणि 120 मीटरच्या प्लॉटवर रो हाऊस आहेत. दरम्यान गेल्या काही वर्षांपासून येथील अंतर्गत रस्त्यांकडे दुर्लक्ष केले गेले. त्याचबरोबर नालेसफाई ही केवळ वरवर केले जाते. परिणामी पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. जास्त पावसात गुडघ्यापर्यंत पाणी साचून जनजीवन विस्कळीत होते. कायम पाणी रस्त्यावर राहिल्याने ठीक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. एकाही रस्त्यांवर डांबर सुद्धा शिल्लक दिसत नाही. अक्षरशा चाळण झाल्याने वाहने चालवता येत नाहीत. गटारांची झाकणे उघडे असल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर सिडको प्राधिकरणाने या परिसरात ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळे अंतर्गत रोडची अवस्था ग्रामीण भागातील रस्त्यांची पेक्षाही बिकट झालेली आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात नगरसेवक राजेंद्र शर्मा त्यांनी वारंवार सिडकोकडे पाठपुरावा केला. पत्रप्रपंच
करून सिडकोच्या अधिकाऱ्यांना पाहणी करण्यासाठी पाचारण केले. येथील विदारक स्थिती यांच्या निदर्शनास आणून दिली. त्याचबरोबर नगरसेविका प्रमिला रवीनाथ पाटील, स्थायी समितीचे माजी सभापती अमर पाटील, भाजपाचे कळंबोली मंडल अध्यक्ष रवीनाथ पाटील यांनीही सिडकोच्या संबंधित अधिकाऱ्यांना अल्टिमेटम दिले. संबंधित रस्त्यांची झालेली दुरावस्था लक्षात आणून दिली. दरम्यान सिडकोने या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम बुधवारपासून हाती घेतले आहे. त्याचबरोबर पावसाळी नाल्यांची मधील मातीही काढण्यात येत आहे. परिणामी स्थानिक रहिवाशांचा त्रास काही दिवस का होईना कमी होणार आहे.
कोट
प्रभाग क्रमांक सात मधील सेक्टर 14 आणि 15 येथील रस्त्यांबाबत आम्ही स्थानिक नगरसेवक म्हणून सातत्याने पत्रप्रपंच केला. याबाबत सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. त्यांना त्या ठिकाणी घेऊन जाऊन प्रत्यक्ष वस्तुस्थिती दाखवली. त्या पार्श्वभूमीवर सिडकोने डागडुजीचे काम हाती घेतले आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी आम्ही सिडकोकडे केली आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनानुसार पाठपुरावा सुरू आहे. पावसाळ्यानंतर हे सर्व रस्ते चांगले होतील.
राजेंद्र शर्मा
नगरसेवक पनवेल महापालिका