प्रियकराबरोबरील आर्थिक हितसंबंधांने केला महिलेचा घात
मोर्बे धरणाच्या जलाशयात सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली
पनवेल तालुका पोलिसांकडून शिताफीने क्लिष्ट गुन्ह्याची उकल
सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांची माहिती
पनवेल /प्रतिनिधी:- तालुक्यातील मोर्बे जलाशयात तारा व रस्सीने बांधलेला एका महिलेचा मृतदेह तीन दिवसांपूर्वी आढळला होता. बरेच दिवस पाण्यात राहिलेल्या संबंधित मृत महिलेची ओळख पटणे कठीण होते. मात्र तिच्या हातातील बांगड्या आणि गोंधण यावरून पनवेल तालुका पोलिसांनी अत्यंत शिताफीने आणि कौशल्य पूर्ण तपास करून 48 तासात मयताची ओळख पटवली. त्याचबरोबर या गुन्ह्याची उकल करीत आरोपींना बेड्या ठोकल्या . संबंधित महिलेच्या प्रियकराने आर्थिक हितसंबंधांमुळे तिची हत्या केल्याचे उघड झाले आहे. पनवेल विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांनी पत्रकार परिषद घेऊन या गुन्ह्याच्या प्रगटीकरणाबाबत शनिवारी माहिती दिली.
16 सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील मोर्बे धरणाच्या जलाशयामध्ये रस्सीने व तारेने एका 48 किलो वजनाचे सिमेंटचे पोलभोवती समांतर गुडाळुन बांधलेले स्थितीत एका अंदाजे 30 ते 35 वर्षे वयोगटातील महीलेचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले. मृतदेह पाण्यात जास्त काळ राहील्याने तो सडलेले व फुगलेले अवस्थेत होता. चेहरा विद्रुप झालेला असल्याने ओळखण्याचे स्थितीत नव्हता . यावरून पनवेल तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. अंगावर कोणत्याही प्रकारची कपडे नसल्याने व संपूर्ण प्रेत फुगल्याने चेह-यावरून मृतदेहाची ओळख पटवणे अवघड होते . पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह, सह पोलीस आयुक्त डॉ जय जाधव, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 अशोक दुधे , गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रविण पाटील , पनवेल विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र गिड्डे , गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद चव्हाण . यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे पनवेल तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपुत यांनी गुन्हयाचा तपास चालु केला. मयताचे एका हातात असलेले बांगडया व गोंदलेले चिन्ह या छोटयाशा पुराव्यावरून साक्षीदारांचे मार्फतीन मृतदेहाची ओळख बारा तासाचे आत पटवण्यात यश प्राप्त झाले . त्यानुसार सदर मृतदेह हा आकुर्ली , पनवेल येथे राहणारे एका 27 वर्षे महीलेचा असल्याचे निष्पन्न झाले . तपासा दरम्यान माहीती मिळाली की , मृत महिलेचे कोप्रोली गाव येथे राहणाऱ्या 32 वर्षीय युवकाशी अनैतिक संबंध होते . तसेच सदर महीलेकडून त्याने काही रक्कमही घेतलेली होती . या पैशावरून त्यांचेत नेहमी वाद होत होते . त्या वादातून त्यानेच साथीदारांचे मदतीने सदरचे कृत्य केल्याबाबत बातमीदाराकडून खात्रीशिर माहीती मिळाली होती . त्यानुसार सदर युवकाचा शोध घेत असताना तो गुन्हा दाखल झाल्यापासुन गावातून पसार झाल्याची माहीती मिळुन आली होती . संशईत आरोपी हा त्याचे इतर साथीदार व मयताचे लहान मुलीसह सध्या सातारा जिल्हयातील कोरेगाव परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली होती . त्याप्रमाणे पनवेल तालुका पोलीस . ठाणेकडील तपास पथकातील अधिकारी अंमलदार कोरेगाव , जि . सातारा येथे पाठवण्यात आले होते . तपास पथकातील अधिकारी अंमलदारांनी कोरेगाव पोलीस स्टेशनचे पो.नि. सुनिल गोडसे व त्यांचे अधिकारी अंमलदार यांचे मदतीने संशईत आरोपींचा शोध घेवुन गुन्हयातीत मयत महीलेशी अनैतिक संबंध ठेवणारा 32 वर्षीय युवकासह त्याचे 23 ते 29 वर्षे वयाचे तीन साथीदार यांनाही दिनांक 18 सप्टेंबरला कोरगाव , जि . सातारा येथुन ताब्यात घेवुन , पनवेल तालुका पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले. त्यांचेकडे गुन्हयाबाबत चौकशी करता. गुन्हयातील सहभाग निष्पन्न झाला. चारही आरोपींना अटक करून गुन्हा 48 तासाचे आत उघडकीस आणण्यात पनवेल तालुका पोलीस स्टेशनला यश आलेले आहे . अटक आरोपी यांचे ताब्यात मयत महीलेची 07 वर्षीय मुलगीही मिळुन आलेली आहे . याबाबत बाल कल्याण अधिकारी रायगड यांच्याकडून आदेश प्राप्त करून घेवुन सुरक्षिततेसाठी सद्या बालगृहात ठेवण्यात आले आहे . हा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विजय खेडकर , सपोनि नितीन पगार , सपोनि नितीन बडगुजर , महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कुदळे , उपनिरीक्षक सुनिल गुरव , पोलीस हवालदार मंगेश महाडीक शंकर अवतार , अजित म्हात्रे , अमोल कांबळे , मंगेश भुमकर ,बाबाजी थोरात , सागर रसाळ , राकेश मोकल , संदिप चौधरी , लिंबाजी कायपलवाड यांनी महत्वपूर्ण कामगिरी केलेली आहे . गुन्हयाचा अधिक तपास अशोक राजपूत करीत आहेत.