नवीन पनवेल उड्डाणपुलावरील खड्डे भरण्यास वाहतूक पोलिसांनीच केली सुरुवात. पोलिसांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक.
पनवेल / केवल महाडिक : नवीन पनवेल उड्डाणपुलावरुन पनवेलला येताना पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना वाहने चालविताना अडचण निर्माण होत होती. त्याचप्रमाणे वाहतूक कोंडी निर्माण होवून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असल्याची बाब लक्षात येताच पनवेल शहर वाहतूक पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता जेसीबीव्दारे जवळील असलेल्या रेतीने खड्डे भरुन वाहतूक सुरळीत करण्याची कामगिरी केल्याने त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. वाहतूक पोलिसांचे काम वाहतूक कोंडी दूर करण्याचे असते, मात्र महापालिकेचे खड्डे भरण्याचे काम असतानासुध्दा नागरिकांच्या गैरसोयिकडे लक्ष देवून वाहतूक पोलिसांनी खड्डे भरुन वाहनचालकांना दिलासा दिला. महापालिकेचा ढिसाळपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. गेले अनेक दिवस हे खड्डे पडलेले असतानासुध्दा त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे नागरिकांत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत होता. त्यावेळी पनवेल सर्व शहर वाहतूक शाखेत कार्यरत असलेले सहा. पोलीस उपनिरिक्षक वायंगणकर, हवालदार धनंजय घाडगे, महिला पोलीस शिपाई साधना पवार, ज्योती कहांडळ, पोलीस शिपाई निलेश भंगाळे आदी वाहतूक पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावित होते.