कोकण किनारपट्टीवर अनधिकृतपणे एलईडी दिव्यांचा वापर करून परप्रांतीयांकडून होणारी अवैध मच्छिमारी थांबविण्याची मागणी
पनवेल, दि.29 (वार्ताहर) ः कोकण किनारपट्टीवर अनधिकृतपणे एलईडी दिव्यांचा वापर करून परप्रांतीयांकडून होणारी अवैध मच्छिमारी थांबविण्याची मागणी ऑल इंडिया सिफेरर्स अॅण्ड जनरल वर्कर्स युनियनच्या वतीने मत्स्य व्यवसाय बंदरे मंत्री अस्लम शेख व पर्यावरणमंत्री संजय बनसोडे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
ऑल इंडिया सिफेरर्स अॅण्ड जनरल वर्कर्स युनियनचे अध्यक्ष संजय पवार, कार्याध्यक्ष अभिजीत सांगळे, राष्ट्रीय संघटक पराग मुंबरकर, उपाध्यक्ष (महाराष्ट्र) अफजल देवळेकर यांनी संबंधित मंत्रीमहोदयांची भेट घेवून आज या जागतिक वैश्विक संकटातून पुनश्च सुरूवात करीत असताना कोकणातील बहुतांश बंदरांमध्ये बोटी गेले बरेच महिने नांगरुन ठेवल्या आहेत. कोकणातील मच्छिमार बांधवांसमोर नवनवीन संकट उभे राहिले असून काही संकटे निसर्गनिर्मित आहेत. तर काही संकटे मानवनिर्मित आहेत. सध्या कोकण किनारपट्टीवर इतर राज्यातून अनधिकृतपणे एलईडी दिव्यांच्या प्रकाशात मासेमारी केली जाते. त्यामुळे मासळी अलगद जाळ्यात सापडते. या प्रकाराने पारंपारिक मच्छिमार पुरता मेटाकुटीस आला आहे. एलईडी दिव्यांचा वापर करून मासेमारीमुळे माशांचे साठे नष्ट होत आहेत. मच्छिमारांनी यावर तीव्र भूमिका मांडली आहे. लाखो रुपयाचे कर्ज काढून या मच्छिमार बोटी बांधल्या जातात. परंतु त्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे कर्जाचे हप्ते फेडायचे कसे हा प्रश्न समोर उभा आहे. समुद्र किनारपट्टीपासून 12 नॉर्टिकल पर्यंत सागरी प्रदेश हा स्थानिक मच्छिमारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे. तरी परप्रांतीय मच्छिमार 12 नॉर्टिकल पर्यंतच्या जलधी क्षेत्रात एलईडीद्वारे मासेमारी करीत आहेत. त्यामुळे स्थानिक मच्छिमार आणि पर्यावरण उद्ध्वस्त होत आहे. तरी या संदर्भात शासनाने लक्ष घालून स्थानिक मच्छिमारांना योग्य न्याय द्यावा व योग्य मार्ग काढावा अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे.