सिडकोने येत्या 10 दिवसात उलवा नोड विभागातील विविध मागण्यांसंदर्भात सकारात्मक दृष्टीकोन न दाखविल्यास आमरण उपोषण करणार रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष जीवन गायकवाड
पनवेल, दि.10 (वार्ताहर) ः सिडकोने येत्या 10 दिवसात उलवा नोड विभागात आंतरराष्ट्रीय दर्जाचे बौद्ध स्तुप, विविध सेक्टरमध्ये क्रिडांगणे आणि स्मशानभूमी आदी मागण्यांसदर्भात सकारात्मक दृष्टीकोन ठेवून मागण्या मान्य न केल्यास पुन्हा एकदा सिडकोच्या विरोधात भीमशक्ती संघटना आणि रिपब्लिकन सेना यांच्या पुढाकाराने आमरण उपोषण छेडण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष जीवन गायकवाड यांनी सिडको अधिकार्यांच्या बैठकीनंतर दिला आहे.
उलवा नोड येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बौद्ध स्तुप, विविध सेक्टरमध्ये क्रिडांगणे आणि स्मशानभूमी आदी मागण्यांसदर्भात सिडको विरोधात आमरण उपोषण सोमवार दि.12 ऑक्टोबर रोजी छेडण्याचा इशारा भीमशक्ती संघटना आणि रिपब्लिकन सेना व काँग्रेस यांनी दिला होता. परंतु तत्पूर्वी सिडकोच्या अधिकार्यांनी संबंधित पदाधिकार्यांची बैठक बोलावून येत्या 10 दिवसात आपण केलेल्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले व त्यांनी मुदत मागितली. या मागणीला सकारात्मक दृष्टीकोन रिपब्लिकन सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष जीवन गायकवाड, काँग्रेस प्रवक्ते मोहन गायकवाड सर, तालुकाध्यक्ष विनोद गायकवाड, पीआरपीचे नेते नरेंद्र गायकवाड, जयदीप मंगलभाट आदी पदाधिकार्यांनी दिला व आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात अन्यथा 15 दिवसानंतर पुन्हा सर्व भिमशक्ती रस्त्यावर उतरेल सिडको विरोधात आमरण उपोषण छेडेल असा इशारा दिला आहे.
फोटो ः सिडको अधिकार्यांना मागण्यांचे निवेदन देताना रिपब्लिकन सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष जीवन गायकवाड, काँग्रेस प्रवक्ते मोहन गायकवाड सर, तालुकाध्यक्ष विनोद गायकवाड, पीआरपीचे नेते नरेंद्र गायकवाड, जयदीप मंगलभाट आदी