प्रकल्पग्रस्त शेतकर्यांसाठीची ए-2 कंत्राटी-ठेक्याची कामे सिडकोने 3 लाखावरुन 10 लाखापर्यंत करण्याची प्रकल्पग्रस्त ठेकेदार संघटनेची मागणी
पनवेल, दि.22 (वार्ताहर) ः प्रकल्पग्रस्त शेतकर्यांची ए-2 कंत्राटी-ठेक्याची कामे सिडकोने 3 लाखावरुन 10 लाखापर्यंत करावी अशी मागणी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक तसेच मुख्य अभियंता यांच्याकडे दि.बा.पाटील प्रकल्पग्रस्त ठेकेदार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
दि.बा.पाटील प्रकल्पग्रस्त ठेकेदार संघटनेचे पनवेल-उरणचे अध्यक्ष शशिकांत डोंगरे, कार्याध्यक्ष त्रिंबक केणी, सल्लागार रविशेठ पाटील, खजिनदार राजेश गायकर, उपाध्यक्ष मारुती पाटील व इतर पदाधिकार्यांनी या संदर्भात सिडकोच्या अधिकार्यांना निवेदन देवून त्यांनी सांगितले आहे की, कंत्राटी ठेकेदारांसाठी ए-2 ची कामे सिडकोच्या हद्दीत प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या मुलासाठी 5 लाखापर्यंत देत होती. परंतु हीच रक्कम याच ए-2 कामाच्या कंत्राटी, ठेक्याची कामे सिडकोने सन 2012 पासून 3 लाख रुपये केली आहे. हा प्रकल्पग्रस्त शेतकरी कंत्राटी व ठेकेदारांवर मोठा अन्याय आहे. आज आमच्या जमिनी आमच्या हातातून कायमच्या निघून गेल्या आहेत. त्या ठिकाणी टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. आताच्या युवा पिढीला काम नाही आहे, अशा वेळी ते ठेकेदार व कंत्राटदार बनत आहेत. परंतु आमच्यावर सिडकोमार्फत वेळोवेळी अन्याय केला जातो. ओला दुष्काळ किंवा सुका दुष्काळ पडल्यास शेतकर्यांना शासनामार्फत मदत केली जाते. त्याचप्रमाणे त्या जमिनीवर ते पुन्हा दुसरे पिक घेवू शकतात. परंतु आमच्या जमिनीच सिडकोने हिरावून घेतल्या आहेत तर आम्ही पिकविणार काय? असा सवाल अध्यक्ष शशिकांत डोंगरे यांनी केला असून शेतकर्यांची, ठेकेदारांची मुले शिक्षित आणि उच्चशिक्षित झाली आहेत. नोकर्या नाहीत त्यामुळे ठेकेदार, ठेकेदारी करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. सिडकोने वेळोवेळी आमच्या मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी कामावर घेतो असे आश्वासन दिले आहे. परंतु अनेक आश्वासनांची सिडकोने अद्याप पुर्तता केली नाही आहे. तरी सिडकोने या आमच्या मागणीचा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गांभीर्याने विचार करून कामाचे ठेके 3 लाखावरुन 10 लाखापर्यंत करावे अशी मागणी करण्यात आली आहे.