पनवेल महानगरपालिकेने करवाढ न करण्याची शिवसेनेची मागणी
पनवेल, दि.29 (वार्ताहर) ः पनवेल महानगरपालिकेने नवीन करवाढ आकारणी केली आहे. काही विभागात तर कर आकारणीचे पत्रक वाटण्यास सुरूवात केली आहे. त्या करवाढी पत्रकानुसार महापालिकेने जास्तीत जास्त करवाढ केल्याचे निदर्शनास येत असल्याने महानगरपालिकेने जास्त करवाढ करू नये अशी मागणी शिवसेना पनवेल विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर यांनी आयुक्त देशमुख यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात प्रदीप ठाकूर यांनी म्हटले आहे की, शासनाने 29 गावे महापालिकेने समाविष्ट करून महापालिकेची स्थापना केली आहे. परंतु आजही ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील बहुतांश लोकांचा उदरनिर्वाह नोकर्या व उद्योग धंदे यावर अवलंबून आहेत. गेल्या चार वर्षामध्ये त्यांच्या वार्षिक उत्पन्नात कुठल्याही प्रकारची वाढ झाली नाही. सध्याच्या कोरोनाच्या महाभयंकर महामारीमुळे लोकांनी जीवन जगण्यामध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच महापालिका स्थापन करताना 29 गावांना व नगरपालिकेतील रहिवाशांना कोणत्याही प्रकारची करवाढ पुढील दहा वर्षापर्यंत केली जाणार नाही असे आश्वासन शासन अधिकारी व ग्रामसेवक यांनी दिले होते. तरी संबंधित विषयाचा गांभीर्याने विचार करून पनवेल महापालिकेने कुठल्याही प्रकारची करवाढ करू नये अशी मागणी करण्यात आली आहे.