नवी मुंबईतील आणखी आठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 2 ची जबाबदारी गिरधर गोरे यांच्याकडे कळंबोली वाहतूक शाखेचे अंकुश खेडकर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात
विमल बिडवे यांचीही खारघर पोलिस ठाण्यात बदली
नवी मुंबई /प्रतिनिधी:- शुक्रवारी नवी मुंबई पोलिस दलातील 11 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या होत्या. शनिवारी आणखी आठ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या. त्याबाबतचे आदेश नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांनी जारी केले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना नेमणुकीच्या ठिकाणी हजर होण्याचे सूचित करण्यात आले आहे.
गुन्हे अन्वेषणामध्ये हातखंडा असलेले, त्याचबरोबर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणारे अधिकारी म्हणून ज्यांचा पोलिस दलात दबदबा आहे. असे पोलीस निरीक्षक गिरधर गोरे यांची गुन्हे शाखेचे कक्ष क्रमांक २ चे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कोंडीराम पोपेरे यांच्या निवृत्तीनंतर ही जागा रिक्त झाली होती. या कक्षाची अतिरिक्त जबाबदारी पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्याकडे होती. ज्या नावाने गुन्हेगारांचा थरकाप उडतो असे गोरे हे कक्ष क्रमांक दोनचे प्रमुख म्हणून काम करणार आहेत. कळंबोली परिसरातील वाहतुकीला शिस्त लावणारे अंकुश खेडकर यांचीही पनवेल तालुका पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. त्याठिकाणी नियुक्तीस असलेले सतीश जाधव हे विशेष शाखेत काम करतील. उरण पोलीस ठाण्यातील अतुल आहेर यांची एपीएमसी वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील शिंदे यांच्याकडे गुन्हे कक्ष क्रमांक १ ची जबाबदारी असेल. कळंबोली वाहतूक शाखेच्या प्रभारी अधिकारी पदी निशिकांत विश्व कार यांची नेमणूक करण्यात आली आहे. ते याअगोदर कोपरखैरणे पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते. कामोठे पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांची खारघर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. सुभाष निकम हे गुन्हे शाखेतील प्रशासनात यापुढे काम करतील.