नोकरी मिळत नसल्याने एका इसमाची आत्महत्या
पनवेल, दि.22 (वार्ताहर)- परदेशातून शिकून आल्यानंतर देखील नोकरी मिळत नसल्याने आलेल्या नैराश्यांतून एका 38 वर्षीय अविवाहीत व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नवीन पनवेल परिसरात घडली आहे.
सौमित सदाशिव मुजूमदार असे या इसमाचे नाव असून आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत नोकरी मिळत नसल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. सौमित नवीन पनवेल से.-10 मधील हरिकिरण सोसायटीत काही दिवसांपूर्वी राहण्यास आला होता. तो दर दिवशी सकाळी मोबाईलवरून आपल्या वडिलांशी संवाद साधत असे परंतु शनिवारी सौमितने घरच्यांशी संपर्क न केल्याने त्याच्या वडिलांनी याबाबतची माहिती त्याच्या मित्राला दिली. मित्राने त्याच्या घरी जाऊन पाहिले असता त्याचे घर बंद आढळल्याने व तो दरवाजा उघडत नसल्याने पोलिसांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आल्यानंतर आतमध्ये सौमित गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. याबाबत खांदेश्वर पोलिस ठऑाण्यात आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली आहे.