खांदा वसाहतीमधील खोदून ठेवलेल्या महानगर गॅस पाईपलाईनने रस्ता तातडीने डांबरीकरण करावा अन्यथा थाळीनाद आंदोलनाचा इशारा
पनवेल, दि.30 (वार्ताहर)- खांदा वसाहतीमध्ये महानगर गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी गेले 11 महिन्यांपासून खोदून ठेवलेल्या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण व दुरूस्ती करावी अन्यथा 7 डिसेंबर रोजी नवीन पनवेल सिडको कार्यालयासमोर सामाजिक अंतर ठेवून थाळीनाद आंदोलन करण्यात येईल असा इशारा परिवर्तन सामाजिक संस्था महाराष्ट्र व आजाद कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनात महादेव वाघमारे यांनी म्हटले आहे की, खांदा वसाहतीमधील से.- 9 व 7 तसेच शिवाजी चौक ते आसूडगाव मेन रोड येथेमहानगर गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी 1 वर्षांपूर्वी रस्ते खोदून ठेवले आहेत. सदर लाईन टाकण्याचे काम 10 महिन्यांपूर्वी पूर्ण झाले आहे. त्यामुळे सदर खोदून ठेवलेल्या रस्त्यांचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु सिडकोच्या हलगर्जीपणामुळे संपूर्ण पावसाळा वसाहतीतील नागरिकांना खोदलेल्या रस्त्यातून प्रवास करावा लागला आहे. त्यामुळे अनेकांचे अपघात झाले आहेत. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधूनसुद्धा डांबरीकरणाचे काम अद्याप न करण्यात आल्याने येत्या7 डिसेंबर रोजी नवीन पनवेल सिडको कार्यालयासमोर सामाजिक अंतर ठेवून थाळीनाद आंदोलन करण्यात येईल असा इशारा परिवर्तन सामाजिक संस्था महाराष्ट्र व आजाद कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.