बालग्राम अनाथ आश्रमाला ब्लँकेट्स दान करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केले अभिवादन
पनवेल, दि.7 (वार्ताहर) ः बालग्राम अनाथ आश्रम, पनवेल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष तानाजी खंडागळे, संतोष गायकवाड, नरेंद्र गायकवाड, डॉ. अपर्णा गायकवाड, कृषा गायकवाड, बँक ऑफ महाराष्ट्र, नवीन पनवेल शाखेचे, अरविंद मोरे, बालग्रामचे संचालक, डॉ विनायक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते तानाजी खंडागळे म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार व संस्काराने प्रेरित होऊन आपण सुद्धा समाजाचे देणे लागतो या उद्देशाने गायकवाड कुटुंबाने पुढाकार घेऊन बालग्राम अनाथ आश्रमातील मुलांना थंडी पासून संरक्षण मिळण्यासाठी ब्लँकेट्स वाटप करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणार आहेत. तसेच उपस्थित संतोष गोपाळ गायकवाड यांचे नातेवाईक चंद्रभागा गायकवाड यांचा सुद्धा स्मृती दिन आहे.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र गायकवाड म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सर्वात अनमोल अशी संविधानाची भेट दिली आहे. याद्वारे आपण आपले अधिकार व कर्तव्य ह्याचे पालन करून समाजामध्ये एकोप्याचे वातावरण निर्माण करून चांगला भारत घडवू शकतो. याप्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्राचे, अरविंद मोरे म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आहे. आजच्या महापरिनिर्वाण दिनी आपण सर्वानी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मौलिक विचार अमलात आणण्याचा संकल्प केला तर खर्या अर्थाने आपण त्यांना अभिवादन केले असे होईल. याप्रसंगी संतोष गोपाळ गायकवाड यांच्या कुटुंबियां तर्फे ब्लँकेट्स वाटप करण्यात आले. कार्याप्रमाचे संचालन व प्रास्ताविक तानाजी खंडागळे यांनी केले तर आभार प्रदर्शन बालग्रामचे संचालक, डॉ विनायक पाटील यांनी केले. कार्यक्रमास कृष्णा गायकवाड, डॉ अपर्णा गायकवाड, अविनाश गायकवाड,विलास गायकवाड,, मयूर गायकवाड, स्वयं गायकवाड, सचिन तांबे व सतिश पारधे उपस्थित होते.