पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती घडविणार महाचर्चा
नैना शाप की वरदान ? विचार मंथनातून मार्ग काढण्यासाठी पञकारांचा पुढाकार
नैना महाचर्चा समिती प्रमुखपदी पञकार विवेक पाटील
पनवेल, दि.23 (वार्ताहर) ः शहरांचे शिल्पकार असलेल्या सिडकोने गेल्या सात वर्षांआधी नैना नावाचे भुत येथील स्थानिक भूमिपुत्रांच्या मानगुटीवर बसवले. नैना आल्यानंतर येथील भागाचा कायापालट होईल असा काहींचा होरा होता तर येथील भूमिपुत्रांचा तोटा होईल असे काहींचे म्हणणे आहे. याच चक्रव्यूहात अडकलेल्या या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आता पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीने पुढाकार घेतला आहे.
आज पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या विशेष बैठकीत नैना शाप की वरदान ? या विषयावर महाचर्चा घडविण्याचा ठराव करण्यात आला. यावेळी नैना महाचर्चा समिती प्रमुखपदी सिटी बेल लाइव्ह चे समुह संपादक विवेक पाटील यांची निवड करण्यात आली. तसेच समिती सदस्य म्हणून रत्नाकर पाटील, मंदार दोंदे, संजय कदम, केवल महाडिक, निलेश सोनावणे, ओंकार महाडिक, माधव पाटील, मयूर तांबडे, रविंद्र गायकवाड, अनिल कुरघोडे यांचा समावेश करण्यात आला आहे.
या नैना महाचर्चा कार्यक्रमास खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार बाळाराम पाटील, आमदार महेश बालदी, आमदार महेंद्र थोरवे, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक, नैना प्रकल्प अधिकारी वेणुगोपालन, दि बा पाटील सर्वपक्षीय संघर्ष समितीचे अध्यक्ष बबनदादा पाटील, नैना संघर्ष समितीचे पदाधिकारी, सर्वपक्षीय नेते आदींना सहभागी करण्यात येणार आहे.