रोटरी क्लब ऑफ उलवे नोड च्या शिरपेचात मानाचा तुरा
सलग दुसर्या वर्षी मिळवला सर्विस प्रोजेक्ट अवॉर्ड
पनवेल, दि.30 (वार्ताहर) ः उलवे नोड मधील रोटरी क्लब ने सलग दुसर्या वर्षी सर्विस प्रोजेक्ट अवॉर्ड मिळवल्याने त्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. कोरोना काळात केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल रोटरी क्लब ऑफ उलवे नोड यांना यंदाचा सर्विस प्रोजेक्ट अवॉर्ड जाहीर करण्यात आला.यामध्ये असलेल्या निर्बंधांमुळे यंदाच्या वर्षी सोहळा साजरा न करता पुरस्कार ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आले.
कोरोना मुळे लादलेल्या लॉक डाऊन दरम्यान रोटरी क्लब ऑफ उलवे च्या सर्वच सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.वहाळ चे श्री साई मंदिर आणि उलवे कॉलनी असे दोन ठिकाणी त्यांनी अन्नछत्र निर्माण केले होते. उदरनिर्वाहाचे सगळेच मार्ग बंद असल्याने जगावे कसे? असा प्रश्न उपस्थित झालेल्या मजूर, गोरगरीब, कर्मचारी व अल्प उत्पन्न गटातील सर्वच घटकांना त्यांनी सहा महिने अन्नदान केले. रोज किमान तीन हजार नागरिकांना त्यांनी जेवू घातले. तसेच एखाद्या व्यक्तीला कोरोना ची बाधा झाल्यास त्याला हॉस्पिटल उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक सदस्य सक्रिय राहिला. विषाणूचा प्रभाव टाळण्यासाठी सोशल डिस्टंसिंग पाळणे, सतत हात धुणे या गोष्टींचा प्रचार करण्यासाठी प्रत्येक सदस्याचा पुढाकार असायचा. उदरनिर्वाहाचे साधन हरवलेल्या कित्येक मजुरांना त्यांच्या गावी परत जाण्यासाठी रोटरी क्लबच्या सदस्यांनी विनामूल्य वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवून दिली तसेच त्यांच्या प्रवासासाठी तजवीज करून दिली. रोटरी क्लब ऑफ उलवे नोड च्या या कार्याची दखल घेत त्यांना यंदाचे वर्षीचा सर्विस प्रोजेक्ट अवॉर्ड प्रदान करण्यात आला. मागच्या वर्षी याच क्लबला अत्यंत देखणी अशी मॅरेथॉन आयोजित केल्याबद्दल हा पुरस्कार मिळाला होता. एक धाव पाणी वाचवण्यासाठी अशी थीम घेत न भूतो न भविष्यती अशी मॅरेथॉन रोटरी क्लब ऑफ उलवे नोडने आयोजित करून सार्यांची वाहवा मिळवली होती. सर्व्हिस प्रोजेक्ट अवॉर्ड प्रदान करण्याचा सोहळा नेहमीच नेत्रदीपक पद्धतीने साजरा करण्यात येतो.परंतु यंदाच्या वर्षी कोरोना विषाणूचे सावट असल्यामुळे गर्दी टाळण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने पुरस्कार सोहळा संपन्न झाला.रोटरी क्लब ऑफ उलवे नोड चे संस्थापक रवीशेठ पाटील यांनी या पुरस्काराचे सारे श्रेय प्रांतपाल डॉक्टर गिरीश गुणे यांना दिले. रवीशेठ पुढे म्हणाले की डॉक्टर गुणे यांचे कार्य आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे.आमच्या क्लब ची निर्मिती दोन वर्षांपूर्वी झाली असली तरीदेखील आम्ही सलग दोन वर्षात अवॉर्ड मिळवून दाखवले याचे श्रेय मी प्रत्येक सदस्याला देतो.विद्यमान अध्यक्ष शिरीष कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक सदस्य सक्रियपणे काम करत असतो ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.