भूजल सर्व्हेक्षण विभागातर्फे कोकण भवन येथे वाहन चालकांचे उजळणी प्रशिक्षण संपन्न
नवी मुंबई दि.08 :- भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेच्यावतीने कोकण भवन येथे वाहनचालकांसाठी आयोजित करण्यात आलेला “उजळणी प्रशिक्षणाचा” कार्यक्रम आज संपन्न झाला.
या कार्यक्रमास डॉ.पं.ल.साळवे, उपसंचालक भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणा, डॉ.गणेश व.मुळे उपसंचालक (माहिती), श्री.रामदास आरेकर वरिष्ठ खोदान अभियंता, श्री.जगदिश शेलकर पोलीस निरीक्षक (वाहतूक), श्री.मिलिंद चव्हाण, उप अभियंता (यांत्रिकी) पुणे आदि मान्यवर उपस्थित होते.
उजळणी प्रशिक्षणाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी डॉ.पं.ल.साळवे यांनी प्रास्ताविक केले. पोलीस वाहतूक शाखा सीबीडी बेलापूर यांच्यावतीने उपस्थित श्री.जगदिश शेलकर पोलीस निरीक्षक (वाहतूक शाखा) यांनी उपस्थित वाहनचालकांना वाहतूकीचे नियम, दंड व सुरक्षा, वाहनांची नियमित देखभाल दुरुस्ती, भांडार व्यवस्थापन, कर्तव्य व जबाबदाऱ्या या विषयावर सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात वाहतूकीचे नियम, दंड व सुरक्षा याबाबत पीपीटीद्वारे सादरीकरण करण्यात आले. श्री.रामदास आरेकर, वरिष्ठ खोदान अभियंता यांनी सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानले. तसेच श्रीम.मृणाल लोखंडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास मोठया संख्येने वाहनचालक उपस्थित होते.