उंबरखिंड समरभूमी घाट वाटेने सोळा किमी पायी प्रवास
बीडचे दुर्गप्रेमी कचरू चांभारे यांचा सहभाग 360 वा समरभूमी दिन
दि.9अंभोरा (प्रतिनिधी)स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी औरंगजेबाने शायिस्ताखान या सरदारास मोठा फौजफाटा देऊन स्वराज्यावर चाल करून पाठविले होते.शायिस्ताखानाच्या फौजांनी स्वराज्याच्या भूमीत उच्छाद मांडला होता.शायिस्ताखानाचा पराभव करण्यापूर्वी मावळे व मोगल सैनिक यांच्यात काही छोट्या मोठ्या लढाया झाल्या.त्यापैकी उंबरखिंडची लढाई शिवाजी महाराजांचे अकल्पित युद्ध कौशल्य दर्शविणारी आहे.
शायिस्ताखानाच्या फौजेतील एक शूर सरदार कारतलब खानाच्या संपूर्ण सैन्याचा सपशेल पराभव म्हणजे उंबरखिंड समरभूमी होय.कारतलब खानाच्या वीस हजार फौजेला महाराजांनी कुरवंडे घाटातून उंबरे गावाकडे उतरण्यास भाग पाडलं व अवघ्या दोन हजार मावळ्यांना सोबत घेऊन उंबरखिंडीत गाठलेल्या कारतलब खानाचा सपशेल पराभव केला.या लढाईत एकही मावळा धारातीर्थी पडला नाही ,मोगली सेनेजवळची प्रचंड संपत्ती मात्र स्वराज्यास मिळाली.
ही लढाई झाली तो दिवस होता 2 फेब्रुवारी 1661 .मावळ प्रांतातील खंडाळा ते कोकणातील चावणी,उंबरे गावापर्यंतचे अंतर घाट रस्त्याने सोळा किमी आहे.या वाटेने कारतलब खानाच्या फोजेने प्रवास केला होता.ऐतिहासिक घाट रस्ते,युद्ध रस्ते काळाच्या ओघात दुर्लक्षित होऊ नयेत व तेव्हाच्या ऐतिहासिक क्षणाचे रोमांच अनुभवण्यासाठी व्यवसायाने अभियंता असलेले किरण शेलार मुंबई हे दरवर्षी खंडाळा ते उंबरखिंड या सोळा किमीच्या घाट रस्त्याने मोहीम आयोजित करत असतात.हे त्यांचे विसावे वर्ष आहे.यावर्षीच्या मोहीमेत राज्यातील दीडशेहून अधिक शिवप्रेमी तरूण तरूणींचा सहभाग होता.बीडचे कोंडाजी फर्जंद ट्रेकर्स सदस्य दुर्गप्रेमी ,निसर्ग लेखक कचरू चांभारे सरांचाही या मोहिमेत सहभाग होता.अडीच हजार फुट उंचीचा दुर्गम घाट रस्ता उतरून गेल्यावर कोकणातील चावणी गावात अंबा नदीत छत्रपती शिवरायांचे विजयी शिल्प बांधलेले आहे.विजयी मानचिन्हास वंदन करून मोहिमेची सांगता करण्यात आली. गडकिल्ले ,खिंडवाटा घाट रस्ते भ्रमंती केल्याने इतिहासासोबत भूगोल कळतो व ऐतिहासिक घटनातील रोमांच अनुभवता येतो.अशा ऐतिहासिक भ्रमंतीचा साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले.मी धन्य झालो.असे मत कचरू चांभारे यांनी व्यक्त केले.सातत्याने दुर्ग भ्रमंती करणा-या कचरू चांभारे यांच्यावर मित्र परिवाराने अभिनंदनाचा वर्षाव केला .नाणी अभ्यासक किरण शेलार यांच्या नेतृत्वात या मोहिमेत लेखक अनिल भागवत,राहुल नलावडे,महेश पाटील ,इंजि.श्रीरंग राहिंज,रविंद्र पवार,शेडगे मधुकर,राजेंद्र धुमाळ,अंबादास गाजुल इ.शिवप्रेमींचा सहभाग होता.