करंजाडे, वडघर येथील सिडको नोडमध्ये दफनभूमीचा प्रश्न ऐरणीवर,गैरसोयी टाळण्यासाठी अखेर ग्रामस्थांनीच राखीव जागेवर केले फलकाचे अनावरण सिडकोचे दुर्लक्ष : अन्यथा चिंचपाडा ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत
पनवेल,(प्रतिनिधी) — एकीकडे विमानतळाच्या कामांनी वेग घेतला असला तरी प्रकल्पग्रस्तांचा समस्या संपण्याचे नाव घेत नाही. अनेक अडचणींचा सामना त्यांना आजही करावा लागत आहे. हा संघर्ष केवळ जगण्याचा नाही, तर मरणानंतरही तो टळलेला नाही. विठ्ठलवाडी चिंचपाडा येथील दीक्षित कुटुंबाना नुकताच हा गंभीर अनुभव घेतला. एका कुटुंबातील घरातील एका लहान चिमुकलीचे मृत्यू झाल्यानंतर तिला दफन करण्यासाठी जागाच नसल्याने कुटुंबाला अक्षरश: वणवण करावी लागली. अखेर या प्रश्नावर सिडको कधी न्याय देणार या प्रतीक्षेत न थांबता चिंचपाडा ग्रामस्थांनी दफनभूमी साठी आरक्षित असणाऱ्या जागेवर नामफलक उभारून त्याचे उद्घाटन शनिवारी ता. 27 रोजी पार पाडले.
यावेळी समीर केणी, प्रदीप मुंडकर, शशिकांत भोईर, संजय परदेशी, अनिल केणी, शशिकांत जनार्दन केणी, शशिकांत नामदेव केणी अध्यक्ष, श्रावण भोईर, अनंत केणी, अनंत परदेशी, जयवंत परदेशी, उत्तम केणी, रमेश केणी, भरत परदेशी, मोहन परदेशी, ज्ञानदेव केणी, प्रल्हाद भोपी, विठ्ठल केणी, दिलीप मुंडकर, अशोक ढमाले, राम पाटील, प्रकाश केणी, रविकांत भोपी, सुरेश भोपी, शशिकांत गोमा केणी यांच्यासह तरुण मंडळी ग्रामस्थ चिंचपाडा उपस्तित होते.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीत अडथळा ठरणाऱ्या गावांतील ग्रामस्थांना वडघर, करंजाडे या ठिकाणी स्थलांतरित केले आहे. या बाधितांसाठी सिडकोने जागा दिली असली तरी या ठिकाणी कोणत्याच सुविधा अद्याप पुरवण्यात आलेल्या नाहीत. सिडकोने केवळ मोकळ्या भूखंडावर प्रत्येकाला जागा आखून दिली गेली आहे. येथे बाधितांनी आपली घरे बांधायची आहेत. मात्र तोपर्यंत बाधितांना भाड्याच्या घरात राहावे लागत आहे. भाड्याने राहायला गेल्यावर तर ग्रामस्थांच्या अडचणींत अधिकच वाढ होत आहे. विमानतळ बाधितांसाठी सिडकोच्या वतीने वडघर पुष्पकनगर वसवण्यात आले. या ठिकाणी अजून कोणत्याच प्राथमिक सोयीसुविधा नसल्याने बाधित येथे राहायला गेले नाहीत. आपली गावातील घरे तोडून ग्रामस्थांना त्या घरांची किंमत सिडको देणार आहे. त्या किमतीतून वडघर पुष्पकनगरमध्ये घरे बांधायची आहेत. त्यामुळे अनेक बाधित पनवेल आणि उलवेनजीक भाड्याने राहायला गेले आहेत. चिंचपाडा या गावातील अनेक कुटुंब करंजाडेमध्ये राहायला गेले आहेत. सिडकोने सोयीसुविधांचे गाजर ग्रामस्थांच्या पुढ्यात ठेवले, मात्र प्रत्यक्षात सिडकोने ग्रामस्थांची दिशाभूल केली असल्याचा आरोप केला जात आहे. तालुक्यातील कोल्हीकोपर आणि चिंचपाडा येथील गावे उठविल्यानंतर ग्रामस्थांचे वडघर येथे पुनर्वसन करण्यात आले. मात्र त्याठिकाणी पाण्याची व्यवस्था, स्मशानभूमी, दफनभूमी, खेळाची मैदाने, रुग्णालये अशा अनेक सोयीसुविधा पुरविण्यात सिडको अपयशी ठरली आहे. याठिकाणी स्मशानभूमीचे काम सिडकोकडून करण्यात आले असेल तरी स्मशानात ठेवण्यात येणाऱ्या मयताचे पूर्ण शरीर त्यामध्ये मावत नाही. ऐन दुःखाच्या वेळी दफनविधी करण्यासाठी येथील पुनर्वसित ग्रामस्थांना तर तारेवरची कसरत करावी लागत आहे. चिंचपाडा गावालगत असलेल्या विठ्ठलवाडी येथे एका दीक्षित कुटुंबीय यांच्या घरातील एका कोवळ्या चिमुकलीचे दोन दिवसापूर्वी निधन झाले. यावेळी त्या कुटुंबियांसोबत विठ्ठलवाडी यांच्यासह चिंचपाडा ग्रामस्थ त्यांच्या दुःखात सहभागी होत. चिंचपाडा ग्रामस्थाना या चुमुकलीला दफन करण्यासाठी रात्रीच्या वेळी वणवण करावी लागली. त्यामुळे वडघर येथील स्मशानभूमी शेजारी या चुमुकलीला दफन करण्यात आले. यावेळी चिंचपाडा चिंचपाडा ग्रामस्थानी सिडकोकडे वारंवार दफनभूमीसाठी मागणी केली होती. मात्र आजपर्यत सिडकोने प्रकल्पग्रस्ताना फक्त आश्वासनांची गाजरे दाखविली आहेत. सिडकोने प्रकल्पग्रस्ताना स्थलांतरित करीत असताना पहिले नागरी सुविधा देणे अपेक्षित आहे. मात्र करंजाडे वसाहतीत दफनभूमी नसल्याने चिंचपाडा, कोपर आणि कोल्ही गावाच्या नागरिकांनी सिडको विरोधात रोष व्यक्त करीत आहेत. ऐन दुःखाच्या वेळी दफनविधी करण्यासाठी येथील पुनर्वसित ग्रामस्थांना तर तारेवरची कसरत करावी लागत आहे. अखेर या प्रश्नावर सिडको कधी न्याय देणार या प्रतीक्षेत न थांबता ग्रामस्थांनी दफनभूमी साठी आरक्षित असणाऱ्या जागेवर नामफलक उभारून त्याचे उद्घाटन पार पाडले. सिडकोच्या या दुटप्पी भूमिकेमुळे चिंचपाडा ग्रामस्थ आता आक्रमक होताना दिसत आहे