पत्रकार प्रकाश म्हात्रे यांनी केले त्यांच्या खात्यात चुकीने आलेले ग्रामपंचायतीचे ८० हजार परत
पनवेल दि.१ (वार्ताहर)- साप्ताहिक अभेद्य प्रहारचे संपादक प्रकाश जनार्दन म्हात्रे यांच्या बॅंक खात्यात चुकीने आलेले गव्हाण ग्रामपंचायतीचे रुपये ८० हजार हे पुन्हा सदर ग्रामपंचायतीच्या खात्यात वळते केले आहेत.
प्रकाश म्हात्रे यांचे बॅंक ऑफ इंडिया, उलवे शाखा येथे चालू खाते आहे. नुकतीच गव्हाण ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांच्या वृत्तपत्रास एक जाहिरात देण्यात आली होती. त्या संदर्भात ग्रामपंचायतीने त्यांना १० हजारांचा धनादेश दिला होता. सदर धनादेश त्यांनी बॅंकेत भरला असता नजरचुकीने त्यांच्या खात्यात ९० हजार जमा झाले होते. हि बाब म्हात्रे यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने बॅंकेला पत्र लिहून अधिकचे ८० हजार हे ग्रामपंचायतीच्या खात्यात परत पाठवावेत अशी विनंती केली. त्यानुसार बॅंकेनेसुद्धा सदर रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यात वळते केल्याची माहिती प्रकाश म्हात्रे यांनी दिली. या त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.