आदिवासी पाड्यातील दिशा व्यासपीठाचा जागतिक महिला दिन 2021 साजरा
पनवेल/प्रतिनिधी:महिला दिन प्रत्येक वर्षी साजरे करतोच परंतु ह्या वर्षी देवशेतवाडी येथे त्यांच्या पद्धतीने त्यांच्या आयुष्यातील त्यांच्या सारखा 1 दिवस असं जगायचं ठरवलं आणि आम्ही सगळे निघालो देवशेतवाडी कडे.
सकाळी आठच्या सुमारास बस ने प्रवास सुरु झाला.पाड्यातील जीवनशैली अनुभवण्यासाठी सर्वजण उत्सुक होते धमाल मजा मस्ती करत पाड्यावर पोहोचलो.
सकाळच्या नाश्ता पासून सायंकाळच्या चहा पर्यंतची सोय देवशेटवाडीच्या महिलांनी केली होती. सकाळी पोहचल्या बरोबर छान गरमागरम नास्ता करत एकमेकांची ओळख आणि शुभेच्छांचा कार्यक्रम पार पडला.लाजत बुजत तेथील महिलांनी त्यांच्या जीवनशैलीविषयी माहिती दिली.
पाठीमागच्या टेकडीवर ट्रेकिंग करण्यासाठी आम्हाला घेऊन गेले. त्या टेकडीवरून खाली झाडीमध्ये ही सुंदर शेणानं सारवलेली आणि कौलारू घरे टुमदार दिसत होती. रोज या महिला या टेकडीवरून जळणासाठी लाकडं, भाजीपाला, मध, वालाच्या शेंगा, शेवग्याच्या शेंगा अशा गोष्टी आणत असतात. दुपारी डोक्यावर ऊन आल्यावर खाली आल्यानंतर मस्त मडक्यातील थंड पाणी प्यायलो. थोडा आराम करून पाठीमागे मोठ्या झाडाखाली जेवणाची सोय केली होती. त्या महिलांनी बनवलेल्या चुलीवरच्या गरमा गरम तांदळाच्या भाकरी, गरम भात, डाळ खूपच म्हणजे खूपच अप्रतिम चविष्ट होती. रोजच्या जेवणापेक्षा वेगळी चव. त्यामुळे मन प्रसन्न झाले.
त्यानंतर पाड्यामधें जाऊन शेणाने सारवलेल्या भिंती, गेरूने सारवलेली आंगण, भिंतीवर असलेले वारली पेंटिंग, बांबूने बनवलेल्या कुंड्या, लाकडी बस्करे, लाकडी खाटा, घरासमोर फळांची झाडे, हे सर्व पाहून खूप छान वाटले. त्यानंतर त्या महिलांनी आम्हाला वारली पेंटिंग शिकवले. त्या वारली पेंटिंग मध्ये त्यांची जी जीवनशैली आहे त्याचे महत्व आम्हाला सुजाता ने सांगितले. त्यांचा प्रमुख सण होळी असतो. त्याबद्दल माहिती दिली.
शासकीय योजनांपासून हे लोक प्रामुख्याने वंचित असतात. त्यांना त्या योजनांची माहिती देऊन त्या योजनांचा फायदा कसा घ्यायचा याबद्दल पनवेल महानगरपालिका समाजविकास अधिकारी सौ. स्वप्नाली चौधरी मॅडम यांनी मार्गदर्शन केले. *सुजाता चव्हाण* नावाची मुलगी आदिवासी पाड्यात राहणारी राज्य स्तरावर आपल्या खेळाची कारकीर्द दाखवणारी ही मुलगी तहसीलदार बनायचं स्वप्न पाहते आहे. तिची जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास याला सलाम. एवढ्या छोट्याशा आदिवासी पाड्यातून तिच्या आई वडिलांनी तिला एवढे प्रोत्साहन दिले हे वाखाणन्या जोगेसारखे आहे.
महिला दिनानिमित्त त्या सर्व महिलांना आम्ही नवीन साड्या चे वाटप केले. त्याचबरोबर मास्क चे वाटप आणि चॉकलेट्स ही दिले. लहान मुले खूप खूष झाले.
त्या महिलांबरोबर महिला दिनाचा केक कापून सर्वानी तोंड गोड केले.
त्यानंतर आदिवासीचे पारंपरिक नृत्य सोबत पत्र्याच्या डब्याचे वाद्य त्यांनी वाजवून आम्हाला नृत्य शिकवले.
आज त्या महिलांकडून आम्हास खरंच खूप शिकायला मिळाले.शहरी भागापासून दूर अगदी डोगरपायथ्याला हे लोक आपलं जीवन कोणत्याही भौतिक गरजा नसतानाही किती आनंदमय जीवन जगतात याचा प्रत्यय मिळाला. शेवटी चुलीवरचा चहा घेऊन आम्ही देवशेतवाडी चा निरोप घेऊन निघालो त्या पाड्यातील तो दिवस कसा निघून गेला हे
कळलेही नाही महिलांनी केलेला हा महिलांचा सन्मान पाहून त्या मायमाऊलींच्या डोळ्यात आनंदाश्रू
तरळले.मुलीला सासरी पाठवणी करताना चा क्षण डोळ्यासमोर उभा राहिला.
मनामध्ये खूप साऱ्या छान आठवणीं घेऊन पनवेल ला परत आलो. 🙏🏻
विशेष आभार ते म्हणजे सौ. स्वप्नाली मॅडम यांचे कुठल्याही पदाचा अभिमान न बाळगता एक सर्वसामान्य महिला म्हणून आमच्या बरोबर तुमचा अमूल्य वेळ तुम्ही व्यासपीठाबरोबर घालवलात आणि पाड्यातील महिलांबरोबर व्यासपीठातील महिलांनाही मार्गदर्शन केले.
*दिशा महिला मंच*