बँक ऑफ महाराष्ट्रने साजरा केला जागतिक महिला दिन
पनवेल, दि.10 (वार्ताहर) ः बँकिंग उद्योगात अग्रेसर असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या नवीन पनवेल शाखेने मोठ्या थाटात जागतिक महिला दिन साजरा केला . याप्रसंगी बँकेच्या नवीन पनवेल शाखेच्या शाखा प्रबंधक, रत्ना रामगावकर, प्रमुख अतिथी प्रा.डॉ.नीलिमा अरविंद मोरे, अधिकारी, शुभांगी शुक्ला व विशेष सहाय्यक, अरविंद मोरे उपस्थित होते.
आपल्या प्रास्ताविकात, शाखा प्रबंधक, रत्ना रामगावकर यांनी बँक ऑफ महाराष्ट्र आणि महिला ह्या दोन्ही प्रगतीपथावर आहेत ह्याचा त्यांना सार्थ अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी प्रत्येक महिलांनी आपल्या अंगी चांगल्या गुणांना ओळखून त्यांना वाव देऊन आपली व समाजाची प्रगती करण्याचे आव्हान केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी शासकीय अध्यापक महाविद्यालय, पनवेलच्या प्राध्यापिका डॉ. नीलिमा अरविंद मोरे म्हणाल्या की, बँक ऑफ महाराष्ट्र अश्या सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करते व महिलांना प्रोत्साहन देते ही खरोखरच स्तुत्य बाब आहे. डॉ. नीलिमा मोरे म्हणाल्या की, आपल्या महाराष्ट्र राज्याला महात्मा ज्योतिबा फुले,सावित्रीबाई फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांची देण लाभलेली आहे. त्यांच्या अथक परिश्रमामुळे आज आपल्या भारताची स्त्री ही स्वाभिमानाने आपल्या पायावर ताठ उभी आहे व स्वावलंबी होऊन दिवसेनदिवस योग्य ती संधी मिळाल्यावर संधीचे सोने करीत आहे. बँकेने त्यांच्या कर्तृत्ववान महिला ग्राहकांचा सन्मान करून त्यांनी मोलाचे कार्य करून त्यांना अधिक प्रोत्साहन मिळवून ते अधिक चांगले कार्य करण्यास उद्युक्त होतील.
याप्रसंगी बँकेच्या शाखा प्रबंधक, रत्ना रामगावकर यांच्या शुभहस्ते प्रमुख अतिथी प्रा.डॉ.नीलिमा अरविंद मोरे व महिला ग्राहक भावना मुकणे, सारिका गवळी, शोभा पाटील, शालिनी अंगडी, वनिता शिंगण व कमलाबाई म्हात्रे यांचा स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच याप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी प्रा. डॉ. नीलिमा अरविंद मोरे यांच्या शुभहस्ते शाखा प्रबंधक, रत्ना रामगावकर, अधिकारी,शुभांगी शुक्ला व खजांची सीमा मराठे यांचा सुद्धा स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन अरविंद मोरे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशश्वीतेकरिता श्री कीर्थना, शुभांगी शुक्ला, अरविंद मोरे, सीमा मराठे, आकाश शिरवय्या, राजू म्हात्रे व सतीश पारधे यांनी अथक परिश्रम घेतले. बँकेने कोविडच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून महिला दिन साजरा केला. बँकेच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल उपस्थित ग्राहकांनी समाधान व्यक्त केले