उपोषणाच्या इशाऱ्यानंतर पंचायत समितीला जाग, वनविभागाला नव्याने प्रस्ताव पाठविला
पनवेल/प्रतिनिधी: दि.१४ कोरलवाडीला जाणाऱ्या आदिवासी रस्त्याच्या रेंगाळलेल्या कामासाठी सरकारी यंत्रणेच्या विरोधात उपोषणाचा इशारा दिल्यानंतर तीन महिने निद्रिस्त असलेल्या पनवेल पंचायत समितीला जाग आली आहे. नवा प्रस्ताव पाठविण्यात दोन महिने विलंब करणाऱ्या प्रशासनाने उपोषणाचे अस्त्र उपसताच ९ मार्च रोजी प्रस्ताव पाठविला.
पनवेल तालुक्यातील कोरलवाडी आदिवासीवाडीला जाण्यासाठी आजतागायत रस्ता नसल्यामुळे रस्ता बनविण्यासाठी येथील आदिवासी बांधव वर्षांनुवर्षे व्यवस्थेशी झगडत आहेत. सात वर्षांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला गतवर्षी काही प्रमाणात यश आले. प्रांतअधिकारी दत्तात्रेय नवले यांनी या प्रकरणाची दखल घेवून प्रत्यक्ष आदिवासीवाडी जावून अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्यास सांगितले. याचा परिणाम म्हणून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून ठक्करबाप्पा योजनेतून अडीच कोटी रूपयांच्या निधीला मंजुरी मिळाली. मात्र रस्त्या बनविण्यासाठी लागणारी जागा वनविभागाच्या मालकीची असल्यामुळे वनविभागाने हरकती नोंदविल्या होत्या. डिसेंबर २०२० मध्ये पनवेलच्या वनविभागाने पंचायत समितीला पत्र पाठवून प्रस्तावातील त्रुटी दूर करून नव्याने प्रस्ताव सादर करण्याचे सांगितले. वनविभागाच्या पत्राला अडीच महिने पुर्ण होत आले तरी प्रस्तावाला उत्तर दिले नसल्यामुळे आंदोलन, उपोषण, निवेदन देवून शर्तीच्या प्रयत्नाने मिळवलेला निधी केवळ सरकारी यंत्रणेच्या कासवगती कारभारामुळे परत जाईल अशी भिती वाटू लागल्यामुळे कोरलवाडीतील ग्रामस्थांनी १५ मार्च रोजी पनवेल पंचायत समिती प्रशासनाच्या विरोधात उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. पंचायत समितीला निवेदन दिल्यानंतर जागे झालेल्या प्रशासनाने अवघ्या दोन दिवसांत वनविभागाने दिलेल्या पत्राला उत्तर दिले. वनविभागाने उपस्थित केलेल्या ३ वेगवेगळ्या मुद्यांची पुर्तता तातडीने करून विनाविलंब १५ मार्चला पाठविण्यात येईल, मार्च महिना संपण्यापूर्वी सादर रस्त्याचा कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) काढून तात्काळ रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल असे आश्वासन उपोषणकर्ते आदिवासी ग्रामस्थ गुरुदास वाघे, संतोष पवार दिलेल्या पत्रात गटविकास अधिकारी लता ब. मोहिते यांनी दिले आहे. मात्र त्यामुळे आदिवासींनी आपले उपोषण मागे घ्यावे अशी विनंती पत्रातून केली आहे. दरम्यान आदिवासी बांधवांच्या मूलभूत सुविधाबाबत वारंवार कामचुकारपणा करणाऱ्या आपटा ग्राम पंचायतिचे ग्राम विकास अधिकारी, कर्मचारी आणि गट विकास अधिकाऱ्यांची दप्तर दिरंगाई कायद्यान्वये चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी केली आहे.