बँकेत पैसे काढण्यासाठी गेलेल्या तरुणाजवळची 27 हजार 500 रुपयांची रक्कम लुबाडली
पनवेल, दि.14 (वार्ताहर) बँकेत पैसे काढण्यासाठी गेलेल्या तरुणाला दोघा भामट्यांनी बोलण्यात गुंतवून त्याच्याजवळ असलेल्या 1 लाख रुपयांच्या रक्कमेतील 27 हजार 500 रुपयांच्या नोटा चोरुन पलायन केल्याची घटना कळंबोलीतील पंजाब नॅशनल बँकेत शुक्रवारी दुपारी घडली. कळंबोली पोलिसांनी या घटनेतील दोघा भामट्यांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे. या प्रकरणात फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव प्रवेशकुमार तिवारी (23) असे असून तो कळंबोलीतील श्री बालाजी रोड कॅरीअर्स येथे कामाला आहे. तसेच तो त्याच ठिकाणी राहाण्यास आहे. शुक्रवारी दुपारी श्री बालाजी रोड कॅरीअर्स कंपनीच्या मालकाने प्रवेशकुमारला बँकेतून 1 लाख रुपये काढून आणण्यासाठी त्याला चेक दिला होता. त्यानुसार प्रवेशकुमार कळंबोलीतील पंजाब नॅशनल बँकेत गेला होता. यावेळी प्रवेशकुमार याने बँकेतून 1 लाख रुपयांची रक्कम काढल्यानंतर सदर रक्कम तो मोजत उभा होता. याचवेळी त्याच्याजवळ आलेल्या एका भामट्याने बँकेकडून देण्यात आलेल्या नोटांमध्ये काही नोटा डुफ्लिकेट असण्याची शक्यता असल्याने सदर नोटा रबर काढून व्यवस्थित मोजण्याचा सल्ला दिला. त्यामुळे प्रवेशकुमार याने नोटांचे बंडल काढले, मात्र रबर खाली पडल्याने सदरचे रबर उचलण्यास प्रवेशकुमार वाकला. याचवेळी दुसऱया भामट्याने त्याला रबर उचलून देण्याचा बहाणा करुन त्याचे लक्ष विचलीत केले. तर पहिल्या भामट्याने याचवेळी प्रवेशकुमारने ठेवलेले नोटांचे बंडल आपल्याकडे घेऊन त्यातील 27500 रुपयांच्या नोटा काढून घेतल्या. त्यानंतर त्याने सदर नोटा मोजण्यात आल्याचे प्रवेशकुमारला सांगून त्याठिकाणावरुन गुपचुप पलायन केले. त्यानंतर प्रवेशकुमार नोटांचे दोन्ही बंडल घेऊन आपल्या कार्यालयात गेल्यानंतर त्याने नोटा मोजल्या. यावेळी सदर नोटांच्या बंडलमध्ये 27500 रुपये कमी असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्यांनतर बँकेत त्याच्याजवळ नोटा मोजण्याच्या बहाण्याने आलेल्या दोघा भामट्यांनीच लुबाडल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी दोघा भामट्याविरोधात फसवणुकिचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.