लग्नाचे अमिष दाखवून महिलेची फसवणुक करणाऱया भामट्याचा पोलिसांकडून शोध सुरु
नवी मुंबई : पनवेल भागात राहाणाऱया 33 वर्षीय महिलेची, तिच्या पतीने फसवणुक केल्याने त्याला सोडून दुसऱया व्यक्तीसोबत घरोबा करण्याचे स्वप्न या महिलेने रंगविले होते. मात्र दुसऱया व्यक्तीने देखील या महिलेला लग्नाचे अमिष दाखवून तिच्याकडून 1 लाख 5 हजार रुपये उकळून तिची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकिस आला आहे. विकास झिरेकर (36) असे या महिलेची फसवणूक करणाऱया व्यक्तीचे नाव असून एनआरआय पोलिसांनी त्याच्या विरोधात फसवणुकिचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.
या घटनेतील 33 वर्षीय तक्रारदार विवाहित महिलेच्या पतीने, आपले पहिले लग्न झाल्याचे लपवून ठेवत तिच्यासोबत दुसरा विवाह करुन तिची फसवणुक केली होती. त्यामुळे या महिलेने काही वर्षापुर्वीच पतीला सोडून ती मुलीसह उदगीर येथे आपल्या आईच्या घरी राहाण्यास होती. त्यानंतर वर्षभरापासून ती घरकाम करुन पनवेल तालुक्यात मुलीसह राहात आहे. दरम्यान, पंढरपुर येथे राहणारा विकास झिरेकर याची पत्नी क्षय रोगामुळे आजारी असल्यामुळे तसेच त्याला दोन मुले असल्यामुळे तो देखील दुसऱया लग्नासाठी महिलेचा शोध घेत होता. डिसेंबर 2018 मध्ये विकास झिरेकर हा पिडीत महिलेसोबत लग्नाची बोलणी करण्यासाठी तिच्या माहेरी उदगीर येथे गेला होता. त्यावेळी पिडीत महिलेने तिच्या मुलीसह सांभाळ करण्याची अट झिरेकर याला घातली होती. त्यावेळी झिरेकर याने तिच्यासह मुलीचा देखील सांभाळ करण्याचे तिला आश्वासन दिले होते.
त्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचे निश्चित केल्यानंतर झिरेकर व पिडीत महिलेमध्ये मोबाईलवरुन नियमित संभाषण सुरु झाले. विकास झिरेकर हा पिडीत महिलेच्या मुलीसोबत बोलुन तिची विचारपुस करत होता. तर पिडीत महिला झिरेकर याच्या दोन्ही मुलांसोबत संवाद साधत होती. दरम्यान, जानेवारी 2019 मध्ये विकास झिरेकर याने पिडीत महिलेला फोन करुन त्याला ट्रक घेण्यासाठी 1 लाख रुपये कमी पडत असल्याचे सांगून तिच्याकडे 1 लाख रुपयांची मागणी केली होती. यावेळी पिडीत महिलेने विकास झिरेकर याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्याला ट्रक घेण्यासाठी 1 लाख रुपये व खर्चासाठी 5 हजार रुपये त्याला पाठवून दिले होते. त्यानंतर विकास झिरेकर हा पिडीत महिलेसोबत फोनवरुन संपर्कात होता. मात्र पिडीत महिलेने आपल्या पैशांचा विषय काढल्यानंतर तो टाळाटाळ करायचा.
अशाच पद्धतीने विकास झिरेकर याने अनेक महिने टाळाटाळ केली. त्यानंतर त्याने पिडीत महिलेचे फोन घेणे सुद्धा बंद केले. कालांतराने त्याने पिडीत महिलेचा फोन ब्लाक करुन टाकला. त्यानंतर विकास झिरेकर याने फसवणुक केल्याचे पिडीत महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर तिने एनआरआय पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी विकास झिरेकर याच्यावर फसवणुकिचा गुन्हा दाखल करुन तिचा शोध सुरु केला आहे.
![लग्नाचे अमिष दाखवून महिलेची फसवणुक करणाऱया भामट्याचा पोलिसांकडून शोध सुरु](http://worldfamenews.com/wp-content/uploads/2021/03/1589705802725.png)