भरलेल्या घरातच भांडणे होतात, राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे ह्याचं हे प्रमाण : सतीश पाटील – नगरसेवक, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
पनवेल (वार्ताहर)- पनवेल महानगरपालिका क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचा वारू सुसाट सुटला असून राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसची पदे मिळण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ आहे. अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस किती बळकट झाली आहे याचेच हे उदाहरण म्हणता येईल. घर म्हटलं ही भांडणे ही होणारच ! त्यात भरलेल्या घरात तर होणे स्वाभाविकच आहे. त्यामुळे आमच्या काही पदाधिकाऱ्यांनी बंडाचा झेंडा उभारला असला तरी आम्ही त्यांना अजूनही माघारी फिरण्याची संधी देत आहोत. त्यांना असलेल्या शंका, त्यांची नाराजी दूर करून वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक घेण्यात येईल असे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, नगरसेवक सतीश पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले.
या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष शिवदास कांबळे यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस आज रायगड जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष होत चालला आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यात तसेच त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी यशस्वी होत आहेत. पनवेल महानगरपालिका सभागृहात सतीश पाटील राष्ट्रवादी काँग्रेस चा आवाज बुलंद करीत आहेत. आज पनवेलच्या नागरिकांना पाणी प्रश्न भेडसावतोय, पनवेल महानगरपालिकेने लादलेला जुलमी कर नागरीकांचा जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. नागरिकांच्या समस्या आ वासून समोर असताना आम्ही असे आपापसात भांडणे योग्य नसल्याने नाराज असलेल्या कार्यकर्त्यांनी माघारी फिरावे आणि समोर बसून चर्चा करावी. त्याचे नक्कीच फळ त्यांना मिळेल असे आवाहन यावेळी शिवदास कांबळे यांनी केले. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सूरदास गोवारी, जिल्हा उपाध्यक्ष कासमभाई मुलाणी, फारुख पटेल, बळीराम नेटके उपस्थित होते.